BREAKING NEWS
latest

नाशिक जिल्हयातील १३ कृषी बाजार समितीत पुन्हा कांदा लिलाव होणार सुरु ; कांदा व्यापाऱ्यांचा संप अखेर मागे..

प्रतिनिधी: अवधूत सावंत

गेल्या १३ दिवसापासून सुरु असलेला कांदा व्यापाऱ्यांचा संप अखेर मागे घेण्यात आला आहे. त्यामुळे मंगळवार पासून पुन्हा नाशिक जिल्ह्यातील १३ कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लिलाव सुरु होण्याची शक्यता आहे. पालकमंत्री दादा भुसे यांनी नाशिकमध्ये कांदा व्यापाऱ्यांसोबत बैठक घेतल्यानंतर या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला. यावेळी व्यापाऱ्यांनी एक महिन्याच्या आत आमच्या अडचणी केंद्र आणि राज्य सरकारने सोडवाव्यात असा अल्टिमेटम दिला आहे.

ही बैठक झाल्यानंतर 'नाशिक जिल्हा व्यापारी असोसिएशन'चे अध्यक्ष खंडू देवरे यांनी संप मागे घेण्याचा निर्णय जाहीर केला. येत्या मंगळवारपासून कांदा लिलाव पुन्हा सुरु होणार आहे. या बैठकीनंतर मंत्री दादा भुसे यांनी १३ दिवसांमध्ये व्यापाऱ्यांवर बाजार समितीने केलेल्या कारवाया मागे घेण्यात येतील अशी घोषणा केली.

या संपामुळे कोट्यावधींची उलाढाल ठप्प झाली होती. हा संप अजून किती दिवस चालेल हे निश्चित नसल्यामुळे शेतकरी चिंतेत होते. शनिवारी पिंपळगावमध्ये झालेल्या बैठकीत  
व्यापाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत संप सुरूच ठेवण्याची भूमिका घेतली होती. मुंबईत व दिल्लीत कांदा प्रश्नावर काहीच तोडगा न निघाल्यामुळे व्यापारी नाराज होते. त्यामुळे सरकारकडून आमच्या मागण्या मान्य होईपर्यंत व्यापाऱ्यांचा बंद कायम राहणार असल्याची भूमिका कांदा व्यापाऱ्यांनी घेतली होती. पण अखेरीस संप मागे घेण्यात आला.

विंचुर व निफाड येथे लिलाव सुरु करण्यात आले होते. त्यात काही मुद्दायावर व्यापाऱ्यांमध्येच फुट पडू लागल्यामुळे हा संपाच्या एकी वर परिणाम झाला होता. मालेगाव तालुक्यातील एका व्यापाऱ्याने अपशब्द वापरल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर विंचुर येथे रास्ता रोको करण्यात आला होता.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत