मुंबई, ३ नोव्हेंबर: गोवा येथे ४ ते ८ नोव्हेंबर या कलावधीत होणार्या ३७ व्या नॅशनल गेम्स खो-खो स्पर्धेसाठीची गटवारी स्पर्धा प्रमुख व खो-खो महासंघाचे सह सचिव डॉ. चंद्रजीत जाधव व खो-खो महासंघाचे महासचिव एम. एस. त्यागी यांनी जाहीर केली. या स्पर्धेत पुरुषांचे व महिलांचे ८-८ संघ सहभागी होत आहेत. पुरुषांचे व महिलांचे 'अ' व 'ब' गटात ४-४ संघ विभागले आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्राचे कर्णधार म्हणून पुरुष गटात रामजी कश्यप (सोलापूर) तर महिला गटात गौरी शिंदे (धाराशिव) यांची निवड केली गेली आहे.
पुरुष विभागात 'अ' गटात गतविजेत्या महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, प. बंगल व यजमान गोवा यांना तर 'ब' गटात कर्नाटक, ओडिशा, केरळ व तेलंगाना यांना स्थान देण्यात आले आहे. महिला विभागात 'अ' गटात गतविजेत्या महाराष्ट्रासह गुजरात, केरळ, गोवा तर 'ब' गटात दिल्ली, ओडिशा, कर्नाटक व हरियाणा या संघांना स्थान देण्यात आले आहे. सुरवातीला साखळी पध्दतीने व नंतर बाद पध्दतीने सामने पार पडतील. उपांत्य फेरीचे सामने ७ नोव्हेंबरला सायंकाळी तर अंतिम फेरीचे सामने ८ नोव्हेंबरला सकाळच्या सत्रात पार पडतील.
या स्पर्धेसाठी खो-खो महासंघाचे सह सचिव डॉ. चंद्रजीत जाधव यांची स्पर्धा प्रमुख (स्पर्धा संचालक) म्हणून निवड झाली आहे. तर गोविंद शर्मा, प्रशांत पाटणकर, किशोर पाटील, कृष्ण कारंजळकर, रातराणी कोळी व सचिन गोडबोले यांची पंच व अधिकारी म्हणून महाराष्ट्रातून निवड झाली आहे. या स्पर्धेला तांत्रिक संचालक म्हणून गोव्याच्या लिमा लुईस यांची निवड झाली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा