डोंबिवली : शहरातील गर्दीच्या ठिकाणी अपघात होऊन वित्त व जीवित हानी होऊ नये म्हणून फटाके विक्रीस कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने बंदी जाहीर केली असताना डोंबिवलीतील 'फ' आणि 'ग' प्रभागात विविध ठिकाणी बांबू - कपड्यांचे छोटे स्टॉल्स उभारून फटाके विक्री जोमात सुरू करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे या स्टाॅलवरील बॅनर्सवर मंत्री तसेच माजी नगरसेवक यांचे फोटो छापण्यात आले आहेत. याबाबत पालिका अधिकाऱ्यांना विचारले असता ते
म्हणाले कि, महापालिकेच्या वतीने पणत्या, रांगोळी, उटणे, कंदील, रंगी बेरंगी वीज दिवे इत्यादी दिवाळीतील वस्तूंना परवानगी देण्यात आली आहे. मात्र काही विक्रेते दिवाळीतील या वस्तूंच्या आधारे फटाके विक्री करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. डोंबिवली येथील फडके रोड, अंबिका हाॅटेल, के.बी.विरा शाळा, डॉ.राथ रोड अश्या अनेक ठिकाणी फटाके विक्रीचे स्टॉल्स सुरू करण्यात आले आहेत. फटाक्यांची विक्री करण्यात आलेली ठिकाणं हि बाजारातील गर्दीची ठिकाणे आहेत. दिवाळीच्या निमित्ताने सकाळ-संध्याकाळ येथे खरेदीसाठी झुंबड उडालेली असते. अश्या वर्दीळीच्या
ठिकाणी कुणाच्या कृपा आशीर्वादाने आणि वरदहस्ताने फटाक्यांची विक्री सुरू करण्यात आली आहे असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने नेहरू मैदान आणि हभप सावळाराम महाराज क्रिडा संकुल येथे परवानगी दिली असताना मंत्री तसेच माजी नगरसेवकांचे बॅनर लावून शहरात खुलेआम फटाके विक्री सुरू करण्यात आली आहे. अनेक ठिकाणी दिवाळीच्या वेळेस फटाक्यांच्या दुकानांना आगी
लागण्याचे प्रकार वारंवार घडल्या मुळे पालिका गर्दी किंवा वर्दीळीच्या ठिकाणापासून दूर फटाके विक्री करण्यासाठी परवानगी देत असते. पालिकेच्या अग्निशमन दलाचे याबाबत अग्निरोधक सिलेंडर स्टॉल्स वर ठेवण्यासारखे कडक नियम असतात. परंतु सर्व नियम धाब्यावर बसवून फटाके विक्री सुरू केली गेली आहे. प्रभागक्षेत्र अधिकारी, अग्निशमन दल याबाबत काय कारवाई करणार असा सवाल डोंबिवली येथील दक्ष जाणकार नागरिक करीत आहेत. उर्सेकरवाडीत अशा थाटलेल्या स्टॉलवर कारवाई केली. परंतु काही रस्त्यांवर अद्याप असे फटाक्यांचे स्टॉल दिसून येत आहेत. त्याकडे पालिका प्रशासन कधी लक्ष देणार आणि होणाऱ्या अपघाताला कसा प्रतिबंध घालणार असा सामान्य जन माणसात सवाल उपस्थित होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा