ठाणे जिल्ह्यातील १०७ रोटरी क्लब तर्फे येत्या ३ डिसेंबर पासून ते ९ डिसेंबर पर्यंत 'रोटरी सेवा सप्ताह' चे आयोजन करण्यात आले आहे. या काळात सर्व रोटरी क्लब आपापल्या परिसरात विविध सामाजिक उपक्रम राबवणार आहेत, अशी माहिती रोटरी डिस्ट्रिक्ट ३१४२ प्रांतपाल मिलिंद कुलकर्णी यांनी उपस्थित पत्रकारांना दिली.
या रोटरी सेवा सप्ताहाची माहिती देण्यासाठी बोलावण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत प्रांतपाल श्री. कुलकर्णी यांनी सांगितले की ३ डिसेंबर हा 'वसुंधरा दिवस' म्हणून साजरा करण्यात येणार आहे. या दिवशी सर्व रोटरी क्लब पर्यावरणविषयक उपक्रम राबवतील. 'ग्लोबल वॉर्मिंग' बद्दल जनजागृती, जलसंवर्धन, अपारंपरिक ऊर्जेचा वापर आणि घनकचरा नियोजन याबाबत चर्चा सत्रे आणि प्रत्यक्ष उपक्रम राबवण्यात येतील. गेल्या काही दिवसापासून सुरु झालेल्या वायुप्रदूषणाचा उपद्रव लक्षात घेऊन वाहनांची पीयूसी करण्यात येणार आहे खासकरून रिक्षावाल्यांची.
दुसऱ्या दिवशी ४ डिसेंबर रोजी ठिकठिकाणी 'रक्तदान शिबीर' राबवण्यात येणार आहे ज्यातून ५००० बॉटल रक्त जमवण्याचे मानस त्यांनी बोलून दाखविले. तिसऱ्या दिवशी स्त्रीशक्ती वर आधारित विविध उपक्रम राबवण्यात येतील. त्यामध्ये महिलांच्या अधिकाराविषयक कायदे, आरोग्य सबलीकरण, स्वसंरक्षण आदी विषय हाताळण्यात येतील. रोटरीच्या माध्यमातून सेवा करण्यासाठी महिलांना आवाहन करण्यात येत आहे असेही प्रांतपाल कुलकर्णी म्हणाले.
६ डिसेंबर रोजी ज्येष्ठ महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. त्या अंतर्गत आरोग्याची तपासणी, वॉकेथॉनचे आयोजन, ज्येष्ठांच्या अधिकाराबाबत कायदे विषयक माहिती आणि संगणक साक्षरता असे उपक्रम रोटरी क्लबतर्फे राबवले जातील. सातव्या दिवशी 'कृषी दिन' आयोजित करण्यात आला आहे. रोटरी क्लबतर्फ ग्रामीण भागातही गावकऱ्यांच्या मदतीने प्रकल्प राबविले जातात. ऑरगॅनिक फार्मिंग, शासनाच्या विविध योजना वगैरे आणि सिंचन साक्षरता यावर आधारित कार्यक्रम तीन ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे. त्यातून साधारणता ५०० शेतकऱ्यांना सामावून घेण्याचा मनोदय प्रांतपाल मिलिंद कुलकर्णी यांनी व्यक्त केला. आठव्या दिवशी युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात रोटरीच्या इंटरॅक्ट क्लबतर्फ शाळा शाळांमध्ये उपक्रम राबवले जातील. मुलांमध्ये नेतृत्व गुणाला प्रोत्साहन देण्यासाठी 'रोटरी युथ लीडरशिप अवॉर्ड' अर्थात रायलाचा आयोजन होणार आहे. १० ते २८ वयोगटातील तरुणांसाठी हा युवा महोत्सव असेल. सेवा सप्ताहाची सांगता हास्यकवी संमेलनाने होणार आहे. पत्रकार परिषदेत डॉ.उल्हास कोल्हटकर, डॉ.निलेश जयवंत, ज्येष्ठ रोटेरियन मिलिंद बल्लाळ, सर्जेराव सावंत आणि देवराम गगरे उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा