अमरावती : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार महिलांचे सशक्तिकरण करून त्यांना अधिक कार्यक्षम करत आहे. याच अनुषंगाने नवी अमरावती मॉडेल रेल्वे स्टेशन आता पिंक रेल्वे स्टेशन बनले आहे. अमृत योजने अंतर्गत देशातील निवडक रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास केला जात असतांना आता काही रेल्वे स्थानकांचा 'ए' टू 'झेड' कार्यालयीन कामकाज महिलांच्या खांद्यावर सोपविण्यात आला आहे.
त्यापैकी एक भुसावळ मध्य रेल्वे विभागातील, बडनेरा ते नरखेड रेल्वे लाईनवर असलेल्या नवी अमरावती मॉडेल रेल्वे स्टेशन आता 'पिंक स्टेशन' म्हणून कार्यान्वित झाले आहे. या स्टेशनची संपूर्ण जबाबदारी आता रणरागिणी चोखपणे सांभाळून आम्ही पुरुषांच्या तुलनेत कुठेही कमी नसल्याचे दाखवून देत आहेत.
या पिंक रेल्वे स्टेशनवर प्रवाशांना लागणार्या आवश्यक सोईसुविधा, रेल्वे गाड्यांचे आरक्षण, रेल्वे सुरक्षा बल, संगणक कक्ष, पार्सल सुविधा, स्टेशन प्रबंधक, तिकीट निरीक्षक, साफसफाई कामगार सर्वच गुलाबी करण्यात आले आहे.
नवी अमरावती मॉडेल पिंक रेल्वे स्टेशन संपूर्ण महिलांच्या हाती असून या ठिकाणी विविध विभागांमध्ये एकूण १५ महिला कार्यरत आहेत. प्रवासी आणि माल गाड्यांना झेंडा दाखवणे, चालत्या गाडीचे निरीक्षण करणे, गाडी स्टेबल करणे, पॉइंट्समन, तांत्रिक, स्टेशन मास्टर, रेल्वे पोलीस, तिकीट निरीक्षक, संगणक कक्ष, निवेदन इत्यादी कामे या पिंक स्टेशनवर सर्व महिलां मोठ्या जबाबदारीने आपली कर्तव्य करून भूमिका बजावत आहेत.
केंद्र सरकारने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात नवी अमरावती मॉडेल पिंक रेल्वे स्टेशन स्थापन करून रेल्वे विभागातील महिलांच्या कार्य कर्तृत्वाला उजाळा देणारा हा उपक्रम निश्चितच प्रेरणादायी असा ठरला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा