डोंबिवली : डोंबिवली पश्चिम येथे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांचे स्मारक असून या स्मारकाची दुरावस्था झाली आहे. या स्मारकाचे नुतनीकरण आणि सुशोभीकरण करावे अशी मागणी भाजप आणि रिपाइंच्या वतीने कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या 'ह' प्रभागाच्या सहाय्यक आयुक्त स्नेहा करपे यांच्याकडे करण्यात येणार असल्याचे भाजप - रिपइंच्या वतीने प्रसिद्धी माध्यमांना सांगण्यात आले.
मंगळवारी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी भाजपचे पश्चिम मंडल अध्यक्ष समीर चिटणीस आणि रिपाइंचे झोपडपट्टी महासंघाचे अध्यक्ष माणिकराव उघडे तसेच भाजप आणि रिपाइंचे पदाधिकारी, कार्यकर्ते महात्मा फुले यांच्या स्मारकात आले असता, त्यांनी फुले यांच्या स्मारकाची दूरवस्था बघून खेद व्यक्त केला. दूरवस्थेबाबत तातडीने सहाय्यक आयुक्त यांना लेखी निवेदन देण्यात येणार असल्याचे भाजप - रिपाइंच्या वतीने सांगण्यात आले. महापालिका अधिकारी गेल्यावर्षी जयंती निमित्त अभिवादन करण्यासाठी आले असता महात्मा फुले यांच्या स्मारकाचे नूतनीकरण आणि सुशोभीकरण करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु त्यांनी आश्वासन पूर्ण केले नाही. याची आठवण रिपाइंच्या कार्यकर्त्यांनी करून दिली.
महात्मा फुले यांच्या पुतळ्यावरील छत्री जिर्ण झाली आहे. तर पत्र्याखालील महिरप निघून लटकलेला अवस्थेत आहे. तसेच खांबावरील कपडे देखील फाटलेल्या अवस्थेत आहेत. स्मारकाच्या खालील जमिनीवरच्या लाद्या उचकटलेल्या अवस्थेत असून स्वच्छता देखील दिसून येत नाही।असे रिपाइंच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित पत्रकारांना सांगितले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा