BREAKING NEWS
latest

डोंबिवलीतील आपत्ती व्यवस्थापनासाठी झालेल्या मॉकड्रील मध्ये विविध शासकीय यंत्रणा सहभागी..

प्रतिनिधी: अवधूत सावंत

डोंबिवली :  केंद्र शासन आणि गृह मंत्रालयाच्या निर्देशानुसार गुरुवारी सकाळी आपत्ती व्यवस्थापनासाठी डोंबिवली येथे रंगीत तालीम (माॅकड्रील) चे आयोजन करण्यात आले. यात विविध शासकीय यंत्रणा सहभागी झाल्या होत्या. कल्याण तालुका प्रांत अधिकारी विश्वास गुजर, तहसिलदार जयराज देशमुख यांचे मार्गदर्शनानुसार डोंबिवली एमआयडीसी येथील घारडा केमिकल या कंपनीत विषारी वायु  गळती झाली आहे. असे समजून सदर कंपनीत रंगीत तालीम घेण्यात आली. गळती रोखण्यासाठी कल्याण-डोंबिवली महापालिका अग्निशमन दल,  घारडा कंपनीचे अग्निशमन दल यांचेकडून आटोक्यात आणून कंपनीतील वायू गळती मुळे बाधित कर्मचारी व कंपनी बाहेरील बाधित नागरिक यांना महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत प्रथमोपचार करण्यात आले. सदर  रंगीत तालीम समयी महसूल विभागाचे पथक, नागरी संरक्षण दल, एनडीआरएफ पथक, महापालिका अग्निशमन दल, आरोग्य विभाग, स्वच्छता विभाग, विद्युत विभाग, पाणी पुरवठा विभाग, परिवहन विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. अग्निशमन उप आयुक्त अर्चना दिवे, अग्निशमन अधिकारी नामदेव चौधरी, 'फ' प्रभागाचे सह आयुक्त चंद्रकांत जगताप, आपत्ती व्यवस्थापन सह आयुक्त रोकडे असे अनेक अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

 याबाबत प्रांत अधिकारी विश्वास गुजर यांनी सांगितले कि, केंद्र शासन आणि गृह मंत्रालयाच्या  निर्देशानुसार आज आपत्ती व्यवस्थापनासाठी माॅकड्रील डोंबिवली येथे पार पडले. नैसर्गिक आपत्ती उद्भवल्यास कसे सामोरे जायचे याबाबतचा आजचा माॅक ड्रील होता. विशेषत वादळ निर्माण झाले तर, बचावकार्य कसे करावे याबाबत माॅक ड्रील होता. कोकण किनारपट्टी आणि कल्याण तालुक्यात हा उपक्रम झाला. वादळामुळे रासायनिक कंपनीतील गॅस गळती झाल्यास काय परिस्थिती उद्भवू शकते  तसेच सखल भागात पावसाच्या पाण्यातून नागरिकांचे बचाव कार्य कसे करावे याबाबत माॅक ड्रील घेण्यात आला. या माॅक ड्रील मध्ये विविध शासकीय यंत्रणा सहभागी झाल्या होत्या. याबाबत प्रांत अधिकारी विश्वास गुजर यांना नागरी संरक्षण दलातर्फे हॅम रेडिओच्या कार्याबद्दल माहिती देण्यात आली.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत