BREAKING NEWS
latest

भिवंडीत दोन जणांवर गोळ्या झाडणारा मुंबईचा पोलीस शिर्डीत जेरबंद.

प्रतिनिधी: अवधुत सावंत

शिर्डी (अहमदनगर): ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील मैदे गावात एका पोलीसाने दोघांवर ८ गोळ्या झाडल्या होत्या. यानंतर दोन दिवसांपासून फरार असलेल्या मुंबई पोलीस कर्मचाऱ्यास रहाता तालुक्यातील कोल्हार येथे जेरबंद करण्यात शिर्डी पोलिसांना यश आलं आहे.

 ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील मैदे गावात १३ ऑक्टोबर रोजीच्या रात्री ९:३० वाजता अजिम अस्लम सय्यद व फिरोज रफिक शेख या दोघा आतेभावांना जीवे मारण्याचा प्रयत्न झाला. यामध्ये मुंबई पोलीस दलाच्या नायगाव पोलीस मुख्यालय क्यु.आर.टी. मध्ये आर्मरर पदावर कार्यरत असलेल्या सुरज देवराम ढोकरे याने तब्बल ८ गोळ्या झाडल्याची घटना घडली होती. या संदर्भात पडघा पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता ३०७, भारतीय हत्यार कायदा ३/२५ गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपी हा गुन्हा घडल्यानंतर फरार झाला होता.

आरोपीस पिस्तूलासह अटक

 दाखल गुन्ह्यातील फरार आरोपी सुरज देवराम ढोकरे हा अहमदनगर येथून नाशिकच्या दिशेने जाणार असल्याची माहिती मिळाली. या आधारे शिर्डीचे उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांनी तांत्रिक विश्लेषण आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे रहाता तालुक्यातील कोल्हार बस स्थानकात सापळा रचून आरोपी सुरज देवराम ढोकरे यास गुन्ह्यात वापरलेल्या ग्लॉक १९ पिस्तूलासह जेरबंद केले आहे. आरोपीस पुढील तपास कामी ठाणे ग्रामीण पोलीसांच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांनी दिली आहे.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत