कल्याण दि.०२ जानेवारी : कल्याण-डोंबिवलीत आठ पोलीस ठाण्यांमध्ये नागरिक तक्रार नोंदविण्यास आले तर त्यांना यापुढे पोलीसांची सल्ला मसलत न करता थेट 'स्वयं तक्रार मंचा' च्या (सेल्फ हेल्प डेस्क) माध्यमातून तक्रार नोंदविण्याची सुविधा ठाणे पोलीस आयुक्तालयाने उपलब्ध करून दिली आहे. ठाणे पोलीस आयुक्तालय परिसरातील कल्याण मधील हा पथदर्शी प्रकल्प यशस्वी झाला तर तो संपूर्ण ठाण पोलीस आयुक्तालय परिसरातील पोलीस ठाण्यांमध्ये राबविला जाईल, अशी माहिती ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी मंगळवारी येथे दिली.
नवनियुक्त ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी ठाणे पोलीस आयुक्त पदाचा पदभार घेतल्यानंतर आयुक्तालय क्षेत्रात नवनवीन नागरी हिताचे उपक्रम पोलीस ठाण्याच्या माध्यमातून राबविण्यास सुरूवात बांधले केली आहे. नागरिकांना पोलीस ठाण्यात आल्यानंतर पोलीसाची मदत न घेता स्वतःहून तक्रार दाखल करण्याची मुभा असली पाहिजे. पोलीस ठाण्यात आलेला तक्रारदार पोलीसांनी तक्रार दाखल करून घेतली नाही म्हणून परत जाता कामा नये, या उद्देशातून आयुक्त डुंबरे यांच्या संकल्पनेतून 'स्वयं तक्रार मंच' ची संकल्पना पुढे आली आहे. पोलीस ठाण्याच्या प्रवेशव्दारात ह मंच असेल. कल्याण, डोंबिवलीतील रामनगर, विष्णुनगर, मानपाडा, टिळकनगर, बाजारपेठ, महात्मा फुले, कोळसेवाडी, खडकपाडा या आठ पोलीस ठाण्यांमध्ये ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. या सुविधेचा लोकार्पण कार्यक्रम आणि ४३० नागरिकांचे विविध गुन्ह्यांमध्ये हस्तगत केलेले सुमारे तीन कोटीहून अधिक रकमेचा मुद्देमाल परत करण्याचा कार्यक्रम मंगळवारी बाजार समिती जवळील साई नंदन सभागृहात आयोजित करण्यात आला होता.
स्वयं तक्रार मंचाच्या माध्यमातून नागरिक माहिती तंत्रज्ञान विषयक, सायबर विषयक, मोबाईल हरविले, चोरी संबंधी तक्रारी, चारित्र्य पडताळणी अर्ज, ठाणे पोलीस आयुक्तालयासंबंधी माहिती, गुन्ह्याचे प्रथम माहिती अहवाल पाहण्यासाठी, पोलीस विभागाशी तक्रार नोंदविण्यासाठी करू शकतात. अशिक्षित व्यक्तिंना या सुविधेचा वापर करता आला पाहिजे म्हणून प्रत्येक पोलीस ठाण्यात या सुविधेचे संबंधितांना मार्गदर्शन करण्यासाठी प्रशिक्षित पोलीस मंचासमोर तैनात करण्यात येणार आहेत, असे आयुक्त डुंबरे यांनी सांगितले. वर्षभरात आठ पोलीस ठाणे हद्दीतून ४३० गुन्हे उघडकीस आणून पोलीसांनी ऐवज जप्त केला होता. यामध्ये रोख रक्कम २७ लाख ८० हजार, सोन्याचा ऐवज एक कोटी १५ लाख, मोबाईल ४३ लाख ५६ हजार, वाहने एक कोटी सात लाख, इतर ऐवज २५ लाख ४८ हजार. हा सर्व ऐवज संबंधित नागरिकांना आयुक्त डुंबरे यांच्या हस्ते परत करण्यात आला. यावेळी सहपोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे, अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, उपायुक्त सचीन गुंजाळ, सहाय्यक आयुक्त सुनील कुराडे, कल्याणजी घेटे उपस्थित होते.
पोलीस ठाण्यात आल्यावर नागरिकांना स्वयंस्फूर्तीने तक्रार करता यावी, या उद्देशातून हा पथदर्शी प्रकल्प कल्याण विभागात सुरू केला आहे. हा प्रकल्प यशस्वी झाल्यावर तो इतर पोलीस ठाण्यात राबविला जाईल असे ठाणे. पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी प्रसिध्दी माध्यमांना सांगितले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा