नवी दिल्ली: महाराष्ट्रातील कल्याण लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना शिंदे गटाचे लोकप्रिय खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांना यंदाचा संसद रत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. लोकसभेतील उत्कृष्ट कामगिरीवरून संसद रत्न पुरस्कार हा देण्यात येतो. खासदार शिंदे हे १७ व्या लोकसभेतील सर्वोत्कृष्ट कामगिरी असलेल्या पाच सदस्यांपैकी एक ठरले आहेत. २०१९ ते २०२३ या कार्यकाळात डॉ. श्रीकांत शिंदे यांनी ५५६ प्रश्न उपस्थित केले आहेत. ६७ चर्चांमध्ये त्यांनी सहभाग घेतला आहे आणि १२ खाजगी विधेयक त्यांनी मांडली आहेत.
१९९९ या वर्षात स्थापन झालेल्या 'प्राईम पॉइंट फाउंडेशन' या एनजीओ ला डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी संसद रत्न पुरस्काराबाबत सूचना केल्या होत्या. डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या सांगण्यावरून २०१० पासून लोकसभेतील आणि राज्यसभेतील सदस्यांना त्यांच्या उत्तम कामगिरीबद्दल 'संसद रत्न' पुरस्कार हा देण्यात येतो. दरवर्षी संसद रत्न पुरस्कार प्रदान केला जातो. तर 'संसद महा रत्न' पुरस्कार दर पाच वर्षातून एकदा दिला जातो. केंद्रीय मंत्री, निवडणूक आयोगाचे माजी सहसंचालक यांसारखे अनेक सदस्य या पुरस्कारासाठी नावांची शिफारस करत असतात. हा एक प्रकारचा नागरिक सन्मान समजला जातो. लोकसभा आणि राज्यसभा यातील कामकाजामध्ये घेतलेला सहभाग, उपस्थित केलेले प्रश्न, मांडलेले प्रस्ताव, संसदेतील उपस्थिती आणि एकूण दर्जेदार कामगिरीबद्दल हे पुरस्कार दिले जातात. म्हणूनच यंदाचा हा पुरस्कार कल्याण लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांना जाहीर झाला आहे.
२०१४ च्या लोकसभेत निवडून आलेले डॉ. श्रीकांत शिंदे हे सुशिक्षित तरुण खासदारांपैकी एक खासदार होते. २०१९ च्या निवडणुकीतही डॉ. श्रीकांत शिंदे मोठ्या मताधिक्याने निवडून आले आहेत. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ते सुपुत्र आहेत. 'संसद रत्न' पुरस्कार मिळाल्यामुळे डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या कामगिरीच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा रोवला गेला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा