डोंबिवली, दि.३० : विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी २०१४ पासून विविध विषयांवर आधारित प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. दर वर्षी अंदाजे २५,००० हुन अधिक विद्यार्थी या ठिकाणी भेट देतात असे 'डावखर फाउंडेशन' चे आयोजक संतोष डावखर यांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितले. पुन्हा एकदा विद्यार्थ्यांमधील कला गुणांना संधी देण्यासाठी त्यांच्यातल्या शास्त्रज्ञांना वाव देण्यासाठी कल्याण डोंबिवली परिसरातील विद्यार्थ्यांसाठी डावखर इन्फ्रा, रिजन्सी ग्रुप, समर्थ पेट्रोलियम, एनए सोल्युशन, डावखर फाउंडेशन च्या वतीने आंतर शालेय विज्ञान प्रदर्शन आणि पोस्टर् स्पर्धा २९ व ३० जानेवारी २०२४ रोजी रीजन्सी अनंतम, डोंबिवली (पूर्व) येथे सकाळी १० ते संध्याकाळी ७ या वेळेत आयोजित करण्यात आली. सदरचे प्रदर्शन हे सर्वांसाठी विनामूल्य होते व शाळांसाठी बसची सेवा देखील उपलब्ध करून देण्यात आली होती. या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना विज्ञाना बद्दल संपूर्ण माहिती घेण्याची संधी उपलब्ध होणार होती. विद्यार्थ्यांना विज्ञान विषयामध्ये स्वारस्य घेण्यास प्रवृत्त करण्यासाठी विशेष आंतरशालेय विज्ञान प्रदर्शन आयोजित केले होते. तसेच पोस्टर स्पर्धेचे देखील आयोजन करण्यात आले होते. जिंकणाऱ्या शिक्षकांना व विद्यार्थ्यांना रोख, पारितोषिक, विशेष प्रमाणपत्र देण्यात आली असून या वर्षी ४५ शाळा सहभागी होत जवळपास ९० प्रकल्पांचे प्रदर्शन मांडण्यात आले होते.
डावखर फाउंडेशन ने आयोजलेल्या 'आंतर शालेय विज्ञान आणि पोस्टर् स्पर्धा' प्रदर्शनात ५ वी
ते ७ वी आणि ८ वी ते १० वी अशा २ गटांमध्ये स्पर्धा झाली असून दीड लाखांची रोख बक्षीस विजेत्यांना दिली गेली. विज्ञान प्रदर्शनासाठी सौर ऊर्जा, शहरातील काँक्रिटीकरणाचे प्रदूषण, भारतातील वाहतूक व दळणवळण, शेती संदर्भातील नाविन्यता आणि भारताची अंतराळ मोहीम असे विषय देण्यात आले होते तर पोस्टर्स स्पर्धेसाठी भारताचे पर्यटन, फिटनेस व जंक फूड आणि भारताचे यशस्वी उपग्रह असे विविध विषय देण्यात आले होते.
सूर्याची किरणे सोलर पॅनलवर पडल्याने सौरऊर्जेने पॅनल चार्ज होते. त्याचे आपल्यासाठी अनेक फायदे आहेत. गावाकडे याचा जास्त प्रमाणात वापर केला जाऊ शकतो. सौरऊर्जा पॅनलद्वारे शेतात पाणी दिले जाऊ शकते. त्याचबरोबर, स्ट्रीट लाइट्स साठीही पॅनलचा वापर करता येतो असे ओमकार इंग्रजी माध्यम शाळेच्या मैथिली राकेश माने यांनी यावेळी बोलताना सांगितले.
विज्ञान प्रदर्शनात ५ वी ते ७ वी गटात 'साई इंग्लिश स्कूल' आणि 'महिला समिती स्कूल' प्रथम क्रमांक विभागून तर 'पाटकर विद्यालय' द्वितीय आणि 'सेंट जॉन स्कूल' तृतीय तसेच ८ वी ते १० वी गटात प्रथम क्रमांक विभागून 'कोतकर स्कूल' आणि 'गायकवाड स्कूल' यांना देण्यात आला. तर द्वितीय क्रमांक 'रतनबुवा पाटील' आणि 'ओमकार इंटरनॅशनल स्कूल (सीबीएसई)' यांना विभागून देण्यात आला. तृतीय 'अचीवर हायस्कूल' व उत्तेजनार्थ 'एनआरसी स्कूल' यांना देण्यात आला. पोस्टर स्पर्धेमध्ये अनुक्रमे ५ वी ते ७ वी गटात 'अचीवर हायस्कूल', 'गणेश विद्यामंदिर', 'हेरिटेज स्कूल' यांनी प्रथम द्वितीय तृतीय आणि ८ वी ते १० वी गटात 'पाटकर विद्यालय', 'वाणी विद्यालय', 'शंकरा विद्यालय' यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवला आहे. तर बेस्ट प्रेझेंटर म्हणून ५ वी ते ७ वी गटात 'हेरिटेज स्कूलची' आरुषी ओझा, 'पाटकर विद्यालय' चा चिंतामणी राजहंस, तर ८ वी ते १० वी गटात 'डॉन बॉस्को स्कूल'चा अंगद सूर्यवंशी आणि 'एनआरसी स्कूल'ची अमृता कोकतरे यांना पुरस्कार मिळाला.
विज्ञान २०२४ प्रदर्शनाचे सूत्रसंचालन कलाकार प्रणव भांबुरे यांनी केले.
विज्ञान २०२४ प्रदर्शनाचे सूत्रसंचालन कलाकार प्रणव भांबुरे यांनी केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा