BREAKING NEWS
latest

पात्र लाभार्थ्यांच्या कर्ज प्रकरणांना तातडीने मंजूरी द्या.. अन्यथा कडक कारवाईला सामोरे जा - जिल्हाधिकारी अशोक शिनगारे

प्रतिनिधी: अवधुत सावंत

ठाणे, दि.१ (जिमाका) :  बँकांनी गरजू आणि पात्र लाभार्थ्यांची कर्ज प्रकरणे प्रलंबित न ठेवता त्या प्रकरणांना तातडीने मंजूरी देण्याची भूमिका स्विकारावी. यापुढे ज्या बँका जिल्हा प्रशासन आणि पात्र लाभार्थ्यांना सकारात्मक प्रतिसाद देणार नाहीत, त्यांच्यावर अतिशय कडक कारवाई प्रस्तावित करण्यात येईल, अशा कडक शब्दात जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी बँक अधिकाऱ्यांना तंबी दिली आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी अशोक शिनगारे यांच्या अध्यक्षतेखाली आज दि. १ फेब्रुवारी २०२४ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये डी.एल.सी.सी. व डी.एल.आर.सी. ची बैठक संपन्न झाली, त्यावेळी ते बोलत होते.

या बैठकीस जिल्हा अग्रणी बँक अधिकारी नागेंद्र मंचाल, रिझर्व बँकेचे अधिकारी अरुण बाबू , नाबार्डचे सहाय्यक महाप्रबंधक सुशांत कुमार, उद्योग ‍विभाग कोकण विभागाच्या सहसंचालक श्रीमती विजू शिरसाठ, तसेच सर्व राष्ट्रीयकृत बँकेचे मुख्याधिकारी शिवाय काही खाजगी बँकांच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी 'खरीप पीक' कर्जाचे वाटप व 'रब्बी पीक' कर्जाचे वाटप एकूण पीक कर्जामध्ये दिलेल्या उद्दिष्टापैकी ७६ टक्के उद्दिष्ट ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत बँकांनी पूर्ण केलेले आहे, उरलेले उद्दिष्ट २८ फेब्रुवारी २०२४ पूर्वी पूर्ण करावे, सर्व बँकांनी प्राथमिकता क्षेत्रातील कर्ज वाटप वाढवावे, पीएम स्वनिधी चे ठाणे जिल्ह्याला दिलेले उद्दिष्ट पूर्ण करावे, मुख्यमंत्री स्वयंरोजगार योजने अंतर्गत बँकांनी उद्दिष्ट पूर्तीसाठी विशेष प्रयत्न करावेत व जास्तीत जास्त अर्जदारांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी हातभार लावावा, दिलेले उद्दिष्ट फेब्रुवारी २०२४ या महिनाअखेर पूर्ण करावे, जन मन योजने अंततर्गत कातकरी समाजाच्या जास्तीत जास्त लोकांची  जनधन खाती उघडावीत, शिवाय पात्र कातकरी बांधवांना 'केसीसी' कर्ज द्यावे, जिल्हा प्रशासनाने बँकांकडे मागितलेली माहिती वेळच्या वेळी द्यावी, असे स्पष्ट निर्देश उपस्थित बँक अधिकाऱ्यांना दिले. 

यावेळी नाबार्डचे अधिकारी सुशांत कुमार यांनी 'पोटेन्शिअल लिंक क्रेडिट प्लॅन २०२४-२५' पुस्तकाचे जिल्हाधिकारी महोदयांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. सोशल नेटवर्क वर कर्जमाफी संदर्भात खोटे संदेश पाठविले जात आहेत, त्या संदर्भात सर्वांनी सावधानता बाळगावी व अशा अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये, असेही आवाहन करण्यात आले. बैठकीच्या शेवटी जिल्हाधिकारी महोदयांनी दिलेल्या निर्देशांचे सर्व बँका काटेकोर पालन करतील, असे आश्वासित करुन उपस्थित सर्वांचे जिल्हा अग्रणी बँक अधिकारी नागेंद्र मंचाल यांनी आभार मानले.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत