कल्याण : लाईटहाऊस या उपक्रमामधील प्रशिक्षणाचा लाभ युवा पिढी व महिलांनी आवर्जून घ्यावा, असे प्रतिपादन कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड़ यांनी आज केले. कल्याण-डोंबिवली महानगरपालिका, आरबीएल बँक, जीटीटी फाउंडेशन आणि लाईटहाऊस कम्युनिटीज फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आंबिवली येथे लाईटहाऊसच्या उद्घाटना समयी उपस्थितांना संबोधिताना महापालिका आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड़ यांनी हे प्रतिपादन केले.
लाईटहाऊस म्हणजे दिशा दाखविणारा उपक्रम, सर्वजण स्वावलंबी झाले तर, देश विकसित होईल. लाईटहाऊस मधील या प्रशिक्षणाच्या सुविधेचा फायदा घेवुन आयुष्यात पुढे मार्गक्रमण करावे, असे मार्गदर्शन त्यांनी यावेळी उपस्थित विद्यार्थी वर्गास केले. यावेळी 'लाईटहाऊस कम्युनिटी'चे अध्यक्ष डॉ. गणेश नटराजन, 'आरबीएल' बँकेचे उपाध्यक्ष सुमित चौहान तसेच 'जीटीटी फाउंडेशन'च्या विश्वस्त डॉ. उमा गणेश यांची समयोचित भाषणे झाली.
लाईटहाऊस प्रकल्पासाठी महानगरपालिकेने सुमारे २७०० स्क्वेअरफुट सर्व सुविधांयुक्त इमारत आंबिवली येथे उभारली असून, यासाठी आरबीएल बँकेकडून अर्थसहाय्य लाभले आहे. आंबिवली येथील या लाईटहाऊस केंद्रात एसी/फ्रिज रिपेरिंग, ऑफिस एक्झिक्यूटिव्ह, अकाउंट एक्झिक्यूटिव्ह, ब्युटी पार्लर, ग्राफिक डिझाइनिंग, डिजिटल मार्केटिंग, इलेक्ट्रिशन, मोबाईल रिपेरिंग, फॅशन डिझायनिंग, वेब डेव्हलपमेंट, हार्डवेअर नेटवर्किंग, ऑटो कॅड, नर्सिंग असिस्टंट, रिटेल सेल्स एक्झिक्यूटिव्ह तसेच संगणक साक्षरता इ. विविध प्रकारचे कौशल्य विकास प्रशिक्षण दिले जाते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा