कल्याण दि.१४ : कल्याण पूर्वचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावरील गोळीबार प्रकरणातील आरोपी भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांना बुधवारी सकाळी उल्हासनगर येथील चोपडा न्यायालयात पोलीस बंदोबस्तात हजर करण्यात आले. न्यायालयाने आमदार गायकवाड यांच्यासह सहकारी पाचही आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली. सुरक्षेच्या कारणास्तव आमदार गायकवाड आणि आरोपींची तळोजा कारागृहात रवानगी करण्यात आली.
आमदार गायकवाड यांच्या ११ दिवसांच्या पोलीस कोठडीची मुदत बुधवारी संपली. ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या तपास अधिकाऱ्यांनी बुधवारी सकाळी नऊ वाजता आमदार गणपत गायकवाड, त्यांचे सहकारी आरोपी हर्षल केणे, दिव्येश उर्फ विक्की गणात्रा, माध्यम प्रमुख संदीप सरवणकर, वाहन चालक रणजित यादव यांना कडक पोलीस बंदोबस्तात उल्हासनगर न्यायालयात हजर केले.
हे प्रकरण राजकीय आणि गंभीर असल्याने पोलीसांनी सुरक्षेच्या कारणास्तव मंगळवारी रात्रीपासून विशेष खबरदारी घेतली होती. बुधवारी सकाळी नऊ वाजता आमदार गायकवाड यांच्यासह पाच आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले. तपास अधिकाऱ्यांनी आमदार गायकवाड यांच्यासह आरोपींची पोलीस कोठडी वाढून देण्याची मागणी केली. या प्रकरणाचा तपास योग्यरितीने सुरू आहे. तसेच आरोपी तपासाला पूर्ण सहकार्य करत असल्याचे आरोपींच्या वकिलांतर्फे ऍड. नीलेश पांडे, ऍड. समीर विसपुते, ऍड. राहुल गोडसे यांनी न्यायालयाला सांगितले. नवीन मुद्दे तपास अधिकाऱ्यांकडून समोर आले नाहीत. न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून घेऊन आमदार गायकवाड यांच्यासह चार आरोपींना न्यायालयीत कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. आरोपपत्र दाखल होईपर्यंत ही कोठडी वाढत जाईल. तपास अधिकारी या प्रकरणाचा योग्यरितीने तपास करत आहेत. आता आरोपींना तुरुंग प्रशासनाच्या ताब्यात देण्यात आले आहे, असे ऍड. नीलेश पांडे यांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितले. गोळीबार प्रकरणातील आमदार गायकवाड यांचा मुलगा वैभव, नागेश बढेकर हे आरोपी अद्याप फरार आहेत. त्यांचा पोलीस शोध घेत आहेत.
कडक पोलीस बंदोबस्त
आमदार गणपत गायकवाड आणि शहरप्रमख महेश गायकवाड यांच्या मधील आपसी वादाचे हे प्रसंग असल्याने पोलीसांनी आमदार गायकवाड यांना बुधवारी न्यायालयात आणताना विशेष खबरदारी घेतली होती. गेल्या दहा दिवसापूर्वी गोळीबाराची घटना घडल्यानंतर आमदार गायकवाड यांना दुसऱ्या दिवशी न्यायालयात हजर केले होते. त्यावेळी न्यायालयात त्यांच्या समर्थकांची गर्दी होती. भाजप समर्थकांनी न्यायालयाबाहेर घोषणाबाजी केली होती. हे तणावाचे प्रसंग टाळण्यासाठी मंगळवारी रात्रीपासून पोलीसांनी उल्हासनगर न्यायालया पासून २०० मीटर परिसरात जमावबंदी आदेश लागू केला होता. न्यायालय परिसरातील दुकाने बंद ठेवण्यात आली होती. विशेष पोलीस सुरक्षा न्यायालया बाहेर तैनात होती.
न्यायालयीन कामकाजाची वेळ, नागरिकांची न्यायालयातील गर्दी विचारात घेऊन पोलीसांनी बुधवारी सकाळी आमदार गायकवाड यांना न्यायालयात हजर केले. दोन्ही बाजुचे युक्तिवाद झाल्यानंतर आमदार गायकवाड यांची तळोजा कारागृहात कडक पोलीस बंदोबस्तात रवानगी करण्यात आली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा