BREAKING NEWS
latest

कानसे गावात श्री काळभैरवनाथांचा यात्रामहोत्सव उत्साहात संपन्न; कीर्तन, मनोरंजनात्मक कार्यक्रमांसह कुस्त्यांच्या आखाड्याला मोठी गर्दी..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

कानसे (ता. आंबेगाव, जि. पुणे) : गावचे ग्रामदैवत श्री काळभैरवनाथांचा यात्रा महोत्सव मोठ्या उत्साहात आणि भावपूर्ण वातावरणात संपन्न झाला. नऊ दिवस चाललेल्या या महोत्सवात अखंड हरिनाम सप्ताह, महाकालाप्रसाद, रामनवमी उत्सव आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमांसह तांबड्या मातीतील लक्षणीय ठरलेल्या कुस्त्यांच्या जंगी आखाड्याला स्पर्धक मल्लांसह प्रेक्षकांची मोठी गर्दी जमली होती. विशेष म्हणजे मॅट खेरीज तांबड्या मातीच्या या आखाड्यात उतरलेल्या तरूणींच्या कुस्त्याही लक्षवेधी ठरल्या होत्या.
सालाबादप्रमाणे यंदाही कानसे गावात श्रीकाळभैरवनाथ महाराजांच्या यात्रा महोत्सवानिमित्ताने मुंबई, पुणे व अन्य जिल्ह्यांत नोकरी आणि व्यवसायानिमित्त स्थायिक झालेले ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. गावात भावभक्तिचा मळा फुलविण्यासाठी अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या सप्ताहात महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांनी उपस्थित श्रोत्यांना समुपदेशन केले. सप्ताहासह यात्रामहोत्सवात अनेक दानशूर व्यक्तींतर्फे मसालेवडी-भाकरी, आमरस-पुरी, श्रीखंड-पुरी, सारख्या मराठमोळ्या स्वादिष्ट पक्वान्नांचे अन्नदान करण्यात आले होते. दुर्गाष्टमीदिनी ग्रामदैवत काळभैरवनाथांच्या यात्रेनिमित्ताने हारतुरे, कालाप्रसाद, कीर्तन, भजन, झेंडा-काठी नाचवत निघणारी दंडवते, रात्री भैरवनाथांची पालखी, तसेच श्रीकाळभैरवनाथ धर्मदाय संस्था आणि ग्रामविकास मंडळ (मुंबई) यांच्या सौजन्याने रात्री लावणी सम्राज्ञी साधना पुणेकर या 'नाद करायचा नाय' हा लोकमनोरंजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
बुधवारी दुपारी श्रीराम जन्मोत्सवानंतर संध्याकाळी कुस्त्यांच्या जंगी आखाड्याचे आयोजन करण्यात आले होते. गावात ६१ वर्षानंतर दुसऱ्या वर्षी भरलेल्या सर्वात मोठ्या आखाड्यात जिल्ह्यातील विविध गावांतून आलेल्या शेकडो मल्लांनी सहभाग घेतला होता. विशेष म्हणजे आखाड्यात मल्ल तरुणींच्या कुस्त्याही लक्षणीय ठरल्या. ७० हजार ४६२ रूपये अशा रोख रक्कमांसह आकर्षक स्मृतिचिन्ह, ट्रॉफी आणि ढालींनी विजयी मल्लांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. याच दरम्यान रात्री लहान आणि मोठ्या गटासाठी आयोजित केलेल्या नृत्य स्पर्धेलाही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या स्पर्धेतील विजेत्यांना रोख रकमांसह आकर्षक पारितोषिकांनी सन्मानित करण्यात आले. अत्यंत भक्तिमय वातावरणात पार पडलेल्या यात्रा महोत्सवासाठी श्री काळभैरवनाथ देवस्थान ट्रस्ट, श्री काळभैरवनाथ धर्मदाय संस्था, श्री काळभैरवनाथ ग्रामविकास मंडळ, तसेच वाड्या-वस्त्यांतील मंडळांसह गाव आणि पंचक्रोशीतील तरूण कार्यकर्ते, महिला वर्ग आणि अबाल-वृद्धांनी अथक परिश्रम घेतले होते. दरम्यान, कानसे गावचे चेन्नईस्थित उद्योजक तथा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग उर्फ अण्णासाहेब बोऱ्हाडे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते विजयी मल्लाचा रोख रक्कम आणि स्मृतिचिन्हासह ढाल देऊन सन्मान करण्यात आला.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत