कल्याण दि.२२ : मुलांच्या संस्कारक्षम वयातच वाचन संस्कारासोबत इतर संस्कारांची पायाभरणी करणे गरजेचे आहे. अनेक कलावंताना घडविण्याचे कार्य सार्वजनिक वाचनालय कल्याणने केले आहे. १६० वर्षाची वाचन परंपरा जपण्याबरोबरच या बालशिबिराच्या माध्यमातून येणाऱ्या भावी पिढीशीही नाळ वाचनालयाने जोडून ठेवली आहे. झगमगाटी दुनियेत चमकणारे कलावंत आपल्याला दिसतात पण त्यामागे त्यांनी घेतलेले अविरत परिश्रमही लक्षात घेतले पाहिजेत. पालकांनीही या पिढीच्या मनापर्यंत पोहचण्याकरिता त्यांना आपुलकीने जवळ घेतले पाहिजे तरच या पिढीतले अंतर कमी होईल असा मोलाचा सल्ला सुप्रसिद्ध निवेदक, मराठी कलाकार प्रणव भांबुरे यांनी सार्वजनिक वाचनालय कल्याण आयोजित “चला ऐकुया गोष्टी आजींच्या” या बालशिबिराच्या उद्घाटन प्रसंगी बालगोपाळांना दिला. प्रसंगी सार्वजनिक वाचनालय कल्याणच्या विविध उपक्रमांची माहिती व बालशिबिर आयोजनाचा मानस सहग्रंथपाल करुणा कल्याणकर यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केला.
सोम. दि. २२ एप्रिल २०२४ ते ३० एप्रिल २०२४ पर्यंत चालणाऱ्या शिबिरात प्रार्थना, गाणी, गोष्टी, मातीकाम, कापडी/कागदी फुले बनविणे, पॉट पेंटिंग, फुलांची रांगोळी तसेच इतर विविध प्रकारचे पारंपरिक खेळ घेण्यात येणार आहेत. प्रचंड उत्साहात ६० ते ७० बाळगोपाळांनी शिबिरात सहभाग नोंदविला आहे. वाचनालयाचे सरचिटणीस मा. भिकू बारस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली या शिबिराचे नियोजन करण्यात आले आहे. कार्यक्रम प्रसंगी वाचनालयाचे कार्यकारिणी सदस्य अरविंद शिंपी, ज्येष्ठ वाचक सभासद विजयसिंह परदेशी, ज्येष्ठ नागरिक संघ, सुभाष मैदान, कल्याण अध्यक्षा सुनिता मोराणकर, शुभदा जोशी, अनुष्का गोलिपकर, वाचनालयाच्या ग्रंथपाल गौरी देवळे, ग्रंथसेविका, पालक वर्ग, वाचक वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. या शिबिराचे प्रमुख कु. वर्षा माने आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा