मुंबई : केंद्र सरकारच्या सहाव्या व ७ व्या वेतन आयोगानुसार, केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या मुलांना रुपये २५ हजार शैक्षणिक भत्ता देते. त्यापार्श्वभूमीवर पालिका कर्मचाऱ्यांच्या मुलांनाही २५ हजार रुपये शैक्षणिक भत्ता द्यावा अशी मागणी ‘म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेने'चे अध्यक्ष बाबा कदम व उपाध्यक्ष डॉ. संजय कांबळे-बापेरकर यांनी पालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडे केली आहे.
मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना वेतन व भत्ते केंद्र शासनाच्या वेतन आयोगानुसार दिले जातात. केंद्र शासनाने केंद्रातील कर्मचाऱ्यांना वेतन आयोग लागू केला की, सदर वेतन आयोग राज्य सरकार राज्यातील कर्मचाऱ्यांना लागू करतात व त्यानंतर राज्य शासनाच्या धर्तीवर मुंबई महापालिकेतील कर्मचाऱ्यांना तो लागू केला जातो.
मागील काही वर्षांमध्ये महागाई प्रचंड वाढली आहे. त्यामुळेच केंद्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांच्या विविध भत्यांमध्ये सुधारणा केल्या आहेत. पालिका कर्मचाऱ्यांच्या मुलांना सध्या मिळत असलेली शैक्षणिक भत्ता रू.६ हजार ही फारच तुटपुंजी रक्कम आहे. म्हणुनच केंद्र सरकार, सहाव्या व ७ व्या वेतन आयोगानुसार केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या मुलांना जेवढा शैक्षणिक भत्ता देते, तेवढाच पालिका कर्मचाऱ्यांच्या मुलांनाही तो मिळावा ही आमची मागणी रास्त असल्याचे डॉ.बापेरकर यांनी प्रसिद्धी माध्यमांसमोर म्हटले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा