डोंबिवली दि.०२: कल्याण मतदार संघात शिंदे गटाकडून डॉ. श्रीकांत शिंदे यांनी गुरुवारी आपल्या खासदारकीच्या हॅट्ट्रिक साठी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार प्रताप सरनाईक, उल्हासनगरचे कुमार आयलानी, अजित पवार गटाचे प्रवक्ते आनंद परांजपे तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
महाराष्ट्र, केरळ, पंजाब, तामिळनाडू, कर्नाटक, राज्यांच्या संस्कृतीचे दर्शन
महाराष्ट्र, केरळ, पंजाब, तमिळनाडू, कर्नाटक आदी राज्यांच्या संस्कृतीचे दर्शन घडवणारी पथके, सोबत झांज, ढोल-ताशा, लेझीम, भांगडा, आदी वाद्य व नृत्य अशा उत्साहात कल्याण लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. फडके पथ येथील श्री गणेश मंदिरातील बाप्पाचे श्रीकांत शिंदे यांनी सपत्नीक दर्शन घेऊन रॅलीला सुरुवात केली. फडके रोड, बाजीप्रभू चौक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळामार्गे मानपाडा चार रस्ता, टिळक पथ, शेलार नाका, घरडा सर्कल तेथून संत सावळाराम महाराज क्रीडा संकुलपर्यंत रॅली निघाली.
विकास रथावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, मनसे आमदार राजू पाटील, अजित पवार गटाचे आनंद परांजपे, प्रमोद हिंदुराव, उल्हासनागरचे आमदार कुमार आयलानी, बालाजी किणीकर आणि महायुतीतील मित्रपक्षांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने या रॅली मध्ये उपस्थित होते. शिंदे यांनी इंदिरा गांधी चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज आदी राष्ट्रपुरुषांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. 'भारतमाता की जय','वंदे मातरम'च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. डीजे, बँजो वादकांनी 'जय जय महाराष्ट्र माझा','वेडात मराठे वीर दौडले सात', आदी गाण्यांचे सूर आळवले. महिलांची संख्या रॅलीत लक्षणीय होती. रस्त्यात पाणी
वाटप, कार्यकर्त्यांना भोजन व्यवस्था केली गेली होती.
डॉक्टर श्रीकांत शिंदे पाच लाखांच्या मताधिक्यांनी निवडून येणार ; मुख्यमंत्र्यांचा विश्वास
मागील दहा वर्षांत डॉ.श्रीकांत
शिंदे यांनी आपल्या मतदारसंघात विकास कामांच्या माध्यमातून आपली स्वतःची एक वेगळीच छाप सोडली. आजची रॅली ही विजयाचीच रॅली आहे असे जणू काय जाणवत होते. कार्यकर्त्यांची मेहनत आणि मतदारांच्या आशीर्वादाने कल्याण डोंबिवली मतदारसंघात येत्या निवडणुकीत आजवरचे सगळे विक्रम मोडले जातील. पाच लाखांच्या मताधिक्याने डॉ. श्रीकांत शिंदे विजयी होईल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी
गुरुवारी व्यक्त केला. विजयाच्या हॅटट्रिकनंतर पुढची पाच वर्षे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे तुमची सेवा करेल, असे ते म्हणाले. कल्याण- डोंबिवलीतील आजची गर्दी त्याचीच साक्ष देत आहे. मागील १० वर्षांत खासदार शिंदे यांनी केलेल्या कामाची पोहोचपावती आजच्या रॅलीतून दिसली. पुढची पाच वर्षे कल्याण- डोंबिवलीसाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.
पहिल्या निवडणुकीत एकनाथ शिंदे यांचा मुलगा अशी खासदर श्रीकांत शिंदे यांची ओळख होती. निवडून आल्यानंतर विकासकामांतून त्यांनी आपली स्वतःची ओळख निर्माण केली. लग्नसराईचा हंगाम सुरू आहे, लोक गावी गेले आहेत. त्यांना मतदानासाठी बोलवा, बुथवर आपल्याला जास्त काम करायचे आहे. प्रत्येक मतदाराला मतदानासाठी बाहेर काढायचे आहे, असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी कार्यकर्त्यांना दिला. श्रीकांत शिंदे यांना मत म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मत, धनुष्यबाणाला मत म्हणजे मोदींना मत आणि महायुतीला मत म्हणजे मोदींना मत, त्यामुळे सगळ्यांनी २० तारखेपर्यंत मेहनत करा. संपूर्ण राज्यात महायुतीची लाट निर्माण झाली आहे असे मुख्यमंत्री म्हणाले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा