डोंबिवली, दि.१५ : शालेय जीवनात दोन महत्वाचे टप्पे म्हणजे इयत्ता दहावी आणि बारावी. माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर पुढे काय करायचे हा प्रश्न सतत विद्यार्थ्यांना भेडसावत असतो. त्यांना जर उत्कृष्टरित्या मार्गदर्शन करणारा मार्गदर्शक मिळाला तर त्यांच्या मनावरचा ताण हलका होऊन त्यांना विद्याशाखा (फॅकल्टी) निवडण्याचा मार्ग आणि सहाय्य मिळते.
अशाच एका करिअर मार्गदर्शनाचे सत्र दिनांक १५ जून रोजी 'जे एम एफ' संस्थेच्या मधुबन वातानुकुलीत दालनामधे आयोजित केले होते. शैक्षणिक क्षेत्रात उज्वल कार्य करत असलेले व संस्थेचे संचालक, अगणित पदव्या प्राप्त केलेले माननीय डॉ. राजकुमार कोल्हे यांनी ह्या सत्राचे आयोजन व मार्गदर्शन केले. कायमच विद्यार्थ्यांनी उज्वल भवितव्याची वाट आणि कास धरावी ह्यासाठी सतत कार्यरत असलेले डॉ. कोल्हे यांनी दहावी बारावी नंतर मुलांनी काय करावे ही त्यांची मानसिकता ओळखून सुमारे दोन तास त्यांना मार्गदर्शन केले.
सरस्वती पूजन करून व राष्ट्रगीत गाऊन कार्यक्रमाला सुरुवात झाली. डोंबिवली व्यतरिक्त इतर जिल्ह्यातून ही विद्यार्थ्यांनी ह्या करियर मार्गदर्शन सत्रला हजेरी लावली होती. प्रथम क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून व उत्तीर्ण विद्यार्थांना देखील निराश न होता त्यांची पाठ थोपटुन पुढील कारकीर्द कशी असावी किंवा तुम्ही काय करू शकता ? यावर मार्गदर्शन करण्यास सुरुवात केली. प्रत्येकाची आवड निवड ही वेगळी असते. विज्ञान, कला, वाणिज्य ह्या विद्याशाखा तर आहेतच, परंतु त्या शिवाय देखील अनेक तांत्रिक शाखा, संधी शिक्षणासाठी उपलब्ध आहेत.
प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनामध्ये एक कल्पना असते, परंतु त्या कल्पनेला जोड पाहिजे ती तुमची कल्पना शक्तीची. त्यासाठी ध्यानधारणा आणि 'मी करू शकतो' हा स्वतःवरचा विश्वास असणे फार गरजेचे आहे. असे सांगून डॉ. राजकुमार कोल्हे यांनी अनेक मोठ्या यशस्वी व्यक्तींची उदाहरणे दिली. अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. यशस्वी झालेल्या मोठ्या व्यक्तींना देखील अपयशाचा सामोरे जावे लागले आहे. केवळ नशिबावरच अवलंबून न राहता, आत्मविश्वास, सकारात्मकता, शिस्त, वेळेचे नियोजन, संवाद साधण्याची कला, निर्णय घेण्याची क्षमता ह्या सर्व गोष्टी १०० टक्के स्वतःमधे असणे गरजेचे आहे तरच शिक्षणाच्या कारकीर्दीचा आलेख उंचावला जातो असे डॉ. राजकुमार कोल्हे यांनी मुलांना सांगून नेव्ही, मर्चंट नेव्ही, एअरफोर्स, उपग्रह, इंजिनियरिंग बरोबर च वैज्ञानिक, वैमानिक अभियांत्रिकी इत्यादी सारखे कोर्स देखील तुम्ही करू शकता असे मार्गदर्शन केले.
जवळपास ५० पेक्षाही जास्त शाळा, कॉलेज मधून विद्यार्थी या सत्राला उपस्थित होते, त्याच बरोबर त्यांचे शिक्षक व पालक देखील उपस्थित होते. सर्वात उत्कृष्ठ १०० टक्के गुण मिळवणाऱ्या विद्यार्थांना ट्रॉफी व शाल देऊन त्यांचा व त्यांच्या बरोबर त्यांच्या पालकांचाही सत्कार करण्यात आला तर ९० टक्के मिळवणाऱ्या विद्यार्थांना सुवर्णपदक देऊन गौरवण्यात आले. इतर विद्यार्थ्यांना देखील शैक्षणिक साहित्य प्रदान करून सन्मानित केले गेले. त्याच बरोबर बाहेरच्या शाळेतून आलेल्या शिक्षकांना 'आदर्श शिक्षक ' म्हणून शाल, श्रीफळ व मानचिन्ह देऊन त्यांचाही गौरव करण्यात आला. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व पुरस्कार मिळालेल्या शिक्षकांचे संस्थेच्या सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे यांनी अभिनंदन केले व शिक्षणाच्या प्रयत्नांची कास सोडू नका, ध्येयाचा पाठवपुरवा करण्यासाठी लागेल तेवढे परिश्रम घ्या, कारण शिकायची हीच वेळ आणि हेच वय आहे तुमचे स्वतःला सिद्ध करून दाखवण्याचे. असे संस्थेच्या सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे यांनी सांगून मुलांना सदिच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एकनाथ चौधरी यांनी केले तर संगीत शिक्षिका श्रेया कुलकर्णी यांनी वंदे मातरम् म्हणून कार्यक्रमाची सांगता केली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा