डोंबिवली, दि. १२ : गेल्याच महिन्यात एमआयडीसीतील अमुदान कंपनीत बॉयलरचा भीषण स्फोट होऊन डोंबिवली परिसर हादरला होता. या स्फोटात १६ कामगार मृत्यूमुखी पडले. या स्फोटाने डोंबिवलीतील रहिवासी, उद्योजक अद्याप या घटनेतून सावरलेले नाहीत. तशातच पुन्हा डोंबिवली एमआयडीसी मध्ये अग्नी प्रकोप झाला. सकाळी दहा वाजताच्या दरम्यान कार्यालये सुरू होत असतानाच 'इंडो अमाईन्स' कंपनीत स्फोट झाला. स्फोटानंतर कंपनीतील रासायनिक ज्वलनशील वस्तुंना आग लागली. बघता बघता आगीने रौद्ररूप धारण केले.
आग लागताच 'इंडो अमाईन्स' कंपनीसह लगतच्या मालदे कॅपीसिटर्स कंपनीमधील कर्मचारी तात्काळ कंपनी बाहेर आल्याने मोठी जीवित हानी टळली. दोन्ही कंपन्यांचे आगीत मोठे नुकसान झाले आहे. सध्या घटनास्थळी कुलिंगचे काम सुरू आहे. 'इंडो अमाईन्स' कंपनीत शेतीविषयक उत्पादने तयार केली जातात. या उत्पादनांनी भरलेले पिंप आगीने लपेटताच कंपनीत स्फोटांची मालिका सुरू झाली. सुरूवातीला कंपनी कर्मचाऱ्यांनी आगीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला. आगीने रौद्ररूप धारण करताच कर्मचाऱ्यांचे प्रयत्न तोकडे पडले.
'इंडो अमाईन्स' मधील कंपनीच्या आगीच्या ज्वाला जवळच्या 'मालदे कॅपीसिटर्स' कंपनीत पोहचल्या. येथील सुमारे अठरा कर्मचारी तात्काळ कंपनीतून बाहेर पडले. या कंपनीत मीटरला लावणारे कॅपीसिटर्स तयार केली जातात. वीज वाहक तारांचे गठ्ठे या कंपनीत आवारात होते. या कंपनीत ज्वलनशील सामान असल्याने 'मालदे कॅपीसिटर्स' कंपनीने पेट घेतला. या कंपनीतील प्लास्टिकने पेट घेताच काळ्या धुराचे लोळ आकाशाच्या दिशेने जात होते. अग्निशमन दलाच्या १० गाड्या घटनास्थळी दाखल होऊन सततचा पाण्याचा मारा करून अग्निशमन जवानांनी पाच तासांच्या अथक प्रयत्नांनी आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश मिळविले. दोन्ही कंपनीच्या व्यवस्थापनांनी कंपनीत कोणीही कर्मचारी नसल्याची खात्रीशीर माहिती आपत्कालीन यंत्रणा तसेच प्रसिद्धी माध्यमांना दिली आहे.
दरम्यान आगीच्या या वारंवार होणाऱ्या घटनांमुळे एमआयडीसी परीसरातील नागरिकांना जीव मुठीत धरून जगावे लागत आहे. या हानिकारक कंपन्या शहराबाहेर हलवण्यात येतील असे आश्वासन मुख्यमंत्र एकनाथ शिंदे यांनी मागील महिन्यात दिले होते. यावर तत्काळ कारवाई व्हावी अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून, स्फोटातील बाधित कुटुंबाच्या वतीने संघर्ष समितीकडून करण्यात येत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा