कल्याण दि.०५ : वाढत्या तापमानाला नियंत्रित करण्यासाठी महापालिका पालिका क्षेत्रातील मोकळ्या जागांवर 'ट्री गार्डन' संकल्पना राबविणार असल्याची माहिती कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. इंदु राणी जाखड़ यांनी दिली. आज असलेल्या जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून डॉ. इंदु राणी जाखड़ यांच्या हस्ते कल्याण पश्चिमेतील महत्त्वाकांक्षी रिंग रोडवर वृक्षारोपण करण्यात आले, त्यावेळी प्रसिध्दी माध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.
सध्या आपण सर्वच जण बदलत्या तापमानाने त्रस्त असून वृक्ष लागवड करून त्याचे परिणाम कमी कसे करता येतील यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत, विशेषतः आपल्याकडील शहरी भागातील ग्रीन कव्हर (हरित क्षेत्र) कमी होऊ लागले आहे. या पार्श्वभुमीवर कल्याण-डोंबिवली मध्ये असणाऱ्या मोकळ्या जागांवर आपण झाडं लावण्याची मोहीम हाती घेणार आहोत. वन विभाग, महसूल विभाग आणि महापालिकेच्या मालमत्तामध्ये मोठ्या प्रमाणात झाडे लावून 'ट्री गार्डन' ही अनोखी संकल्पना राबविणार असल्याची माहिती आयुक्त डॉ. इंदु राणी जाखड़ यांनी आज प्रसिद्धी माध्यमांसमोर दिली.
दरम्यान आजच्या जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून कल्याण पश्चिम येथील रिंगरोड परिसरात बकुळ प्रजातीची सुमारे १०० झाडे लावण्यात आली. यावेळी महापालिकेच्या शहर अभियंता अनिता परदेशी, मुख्य उद्यान अधीक्षक संजय जाधव, अतुल पाटील तसेच महापालिकेचे सर्व उपायुक्त व इतर अधिकारी यावेळी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा