BREAKING NEWS
latest

कल्याण लोकसभा मतदारसंघात डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या विजयाची हॅट्ट्रिक ; डोंबिवलीत जल्लोष सुरू..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली दि.०४ : लोकसभा २०२४ च्या निवडणुकीत ठाणे जिल्ह्यातील कल्याण मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलं होतं. या मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र डॉ. श्रीकांत शिंदे हे निवडणुकीत उभे होते. या मतदारसंघात श्रीकांत शिंदे यांचा मोठ्या मताधिक्याने विजय झाला आहे.
कल्याण लोकसभा मतदारसंघात श्रीकांत शिंदे यांना एकूण ४ लाख ३९ हजार ९६६ मते पडली तर मविआच्या उबाठा गटाच्या  उमेदवार वैशाली दरेकर यांना २ लाख ३४ हजार ४८८ मते पडली. या मतदारसंघात जवळपास २ लाखांच्या मताधिक्याने डॉ. श्रीकांत शिंदे विजयी झाले आहेत. ठाणे आणि कल्याण या मतदारसंघाची लढाई प्रतिष्ठेची होती. कुठल्याही परिस्थितीत एकनाथ शिंदेंचा पराभव करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी कंबर कसली होती. परंतु ठाणे आणि कल्याणमध्ये शिंदेंच्या शिवसेनेने बाजी मारल्याचं दिसून आले. 
कल्याण लोकसभा मतदारसंघात २०१९ च्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा चार टक्के जास्त म्हणजे ५०.१२ टक्के मतदान झाले होते. या ठिकाणी २० लाख ८२ हजार २२१ मतदारांपैकी १० लाख ४३ हजार ६१० मतदारांनी मतदान केलं होतं. महायुतीचा बालेकिल्ला असलेल्या डोंबिवली, कल्याण ग्रामीण, उल्हासनगर या मतदारसंघांच्या तुलनेत मुंब्रा-कळवा परिसरात झालेले मतदान महायुतीला चिंतेत टाकणारे होते. मुंब्रा-कळवा येथून २ लाख १६ हजार १५९, तर कल्याण ग्रामीणमधून २ लाख ३१ हजार १६२ आणि कल्याण पूर्वमधून १ लाख ५६ हजार २३५ मतदारांनी मतदान केले. ही सर्वाधिक मते असून, डोंबिवलीत १ लाख ४२ हजार १४२, उल्हानसगर १ लाख ३१ हजार ५०५, तर अंबरनाथमध्ये १ लाख ६६ हजार ४०७ मतदान झाले होते. त्यात आजच्या मतमोजणीच्या निकालात डॉ.श्रीकांत शिंदे यांना सुरुवातीपासून आघाडी मिळाली. शेवटच्या टप्प्यापर्यंत ही आघाडी २ लाखांच्यावर पोहचली. 
दरम्यान, एकूण मतदानाच्या टक्केवारीनुसार, ६०.२९ टक्के मते डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या पारड्यात पडली तर वैशाली दरेकर यांना ३२.१७ टक्के मते मिळाली. या मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीनेही शाहबुद्दीन शेख सुलेमानी यांना तिकीट दिले होते. त्यांना १५ हजार ४६० मते पडली. शेवटी निवडणूक आयोगाच्या सुषमा सातपुते यांनी  डॉ.श्रीकांत शिंदे यांना विजयी घोषित करून त्यांना तसे प्रमाणपत्र दिले. त्यानंतर डोंबिवलीत डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या विजयाचा जल्लोष सुरू झाला.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत