डोंबिवली : सांस्कृतिक शहर समजल्या जाणाऱ्या डोंबिवलीतील शिक्षण प्रसारक मंडळाचे के.व्ही पेंढारकर महाविद्यालय विनाअनुदानित करण्याच्या व्यवस्थापनाच्या निर्णयाच्या निषेधार्थ माजी विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक, विद्यार्थी यांचे 'सेव्ह पेंढारकर कॉलेज साखळी उपोषण' सुरु आहे. आज त्या आंदोलनाचा ३६ वा दिवस असून महिना उलटूनही शिक्षण विभाग, मुंबई विद्यापीठ, धर्मादाय आयुक्त, प्रशासनाला जाग आली नाही. त्यांना जागे करण्यासाठी रविवारी पेंढरकर महाविद्यालय ते इंदिरा गांधी चौक अशी निषेध रॅली काढण्यात आली. रॅली पेंढारकर महाविद्यालयासमोरून पुढे घरडा सर्कल, शेलार चौक, टिळक पथ, फडके मार्ग, बाजीप्रभू चौक ते इंदिरा गांधी चौक अशी काढण्यात आली. रॅलीत शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना, रिक्षा संघटना, फळ-फूल-भाजी विक्रेत्यांच्या विविध संघटना, भारत मुक्ती मोर्चा आदींसह मोठ्या संख्येने डोंबिवलीकर नागरिक सहभागी झाले होते. कॉम्रेड काळू कोमास्कर, संजय मांजरेकर, काँग्रेसचे स्थानिक नेते संतोष केणे, सामाजिक कार्यकर्ते सत्यवान म्हात्रे यांचीही या निषेध रॅलीत उपस्थिती होती.
महाविद्यालयाच्या संचालक मंडळाने विनाअनुदाणीत कॉलेज करण्याचा घाट घातला आहे. काल ह्या महाविद्यालयातील एका खाजगी बाउन्सर ने एका अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केला जो तिला मागील १५ दिवसापासून छेडत होता. तिने सदर प्रकार घरी आपल्या आई वडिलांना सांगितला. पालक आणि आंदोलक शिक्षक, माजी विद्यार्थी यांनी मानपाडा पोलीस स्थानकात तक्रार केली. त्यानंतर बाउन्सर वर गुन्हा दाखल होऊन मानपाडा पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
एकंदरीत येथील विद्यार्थीच सुरक्षित नसल्याची खंत व्यक्त करत माजी विद्यार्थी तथा आंदोलन आयोजक सोनू सुरवसे, मराठी विभागाचे प्राध्यापक बाळासाहेब लाहोर व आंदोलकानी कॉलेज प्रशासन, शिक्षण क्षेत्र, कुलगुरू यांचा हि निषेध केला आहे.
प्रशासक न नेमल्यास मंत्रालयात धडक देण्याचा दिला इशारा
डोंबिवली शिक्षण मंडळाच्या के.व्ही पेंढारकर महाविद्यालयाच्या संचालक पदी प्रशासक नेमला नाहीतर हे आंदोलन शिक्षण विभाग संचालक, मंत्रालय, कुलगुरूंच्या दालनापर्यंत पोहोचेल, असा इशारा आंदोलनाचे संयोजक माजी विद्यार्थी सोनू सुरवसे यांनी दिला. डोंबिवलीच्या शिक्षण संस्कृतीच्या नावाला गालबोट लावणाऱ्या मुजोर संस्थाचालकांना हटवा, प्रभाकर देसाईना अटक करा, पेंढरकर कॉलेज विनाअनुदानित होऊ देऊ नका, संचालक उच्च शिक्षण विभाग असे लिहिलेले फलक घेऊन निद्रास्त अवस्थेतेतील यंत्रणांना जागे करण्यासाठी आंदोलकांनी घोषणा दिल्या.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा