डोंबिवली : डोंबिवली पूर्वेकडील पी ऍंड टी कॉलोनी मधील होली एंजल्स शाळेत दिनांक ६/७/२०२४ रोजी सन २०२३-२४ ला झालेल्या 'सीबीएसई' बोर्डाच्या इयता दहावी च्या परीक्षेत उत्तम यश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ तसेच कौतुक सोहळा पार पडला. सदर समारंभास शाळेचे संस्थाचालक डॉ.ओमेन डेविड, ट्रस्टी लीला ओमेन, प्राचार्य बिजॉय ओमेन, मुख्याध्यापिका रफत शेख, विद्यार्थी, शिक्षक व पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माध्यमिक विभागाच्या शिक्षिका सौ.रेवती अय्यर यानी केले. प्रथम व्यासपीठावरील मान्यवरांचे व उपस्थित पालक, शिक्षक व विद्यार्थ्यांचे स्वागत रेवती अय्यर यांनी केले. त्यानंतर प्राचार्य बिजॉय ओमेन यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून मार्गदर्शनपर भाषण केले, त्यात त्यांनी मुलांचे, पालकांचे व इयत्ता दहावीला शिकवणाऱ्या सर्व शिक्षकांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. मेरिटमध्ये येणाऱ्या व ९०% पेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना उद्देशून यापुढेही असेच यश मिळवण्यासाठी सातत्याने प्रयत्न व पाठपुरावा सुरु ठेवायला हवा असे म्हणत त्यांनी विद्यार्थ्यांना पुढील भविष्यासाठी भरभरून शुभेच्छा दिल्या. तसेच इयत्ता दहावी व बारावीचा गेल्या कित्येक वर्षापासून लागणाऱ्या शाळेच्या शंभर टक्के रिझल्ट चे सातत्य याही वर्षी कायम राखले गेले याविषयी त्यांनी पालकांना अवगत केले व त्यासाठीही शिक्षक व पालक वर्गाचे मनःपूर्वक अभिनंदन केले.
यानंतर मेरिटमध्ये आलेल्या प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या विद्यार्थ्यांनी अनुक्रमे श्रेयस शाम अय्यर (९८.८०), आर्या केदार देवधर (९६.८०), हितांशू राजेश हातीसकर (९५.८०), यांनी आपले मनोगत यावेळी व्यक्त केले व त्यात त्यांनी संस्थेचा व शिक्षकांनी केलेल्या मार्गदर्शनाचा उल्लेख करून त्यांचे मनःपूर्वक धन्यवाद मानले. यानंतर माननीय संस्थापक डॉ. ओमेन डेव्हिड यांच्या हस्ते मुलांना ट्रॉफी, पुष्पगुच्छ व डेविड सरांच्या जीवन चरित्रावर आधारित टीचर सौ.रेवती अय्यर यांनी लिहिलेले पुस्तक 'डॉ.ओमेन डेविड ए मॅन ऑफ सब्स्टन्स' या पुस्तकाची एक-एक प्रत देण्यात आली व सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
यानंतर संस्थेचे संस्थापक डॉ. ओमेन डेविड सर यांनी गुणवंत विद्यार्थ्यांना उद्देशून प्रेरणादायी भाष्य केले, त्यात त्यांनी सर्वप्रथम मुलांचे, पालकांचे व शिक्षकांचे अभिनंदन केले. डोंबिवली शहरातील विद्यार्थ्यांना कॉलेज साठी मुंबईकडे धाव घ्यावी लागते कारण डोंबिवली येथील कॉलेजेसची संख्या पुरेशी नाही याच विचाराने प्रेरित होऊन आम्ही कॉलेज सुरु केले आहे व शाळेप्रमाणेच कॉलेजची गुणवता उत्तम राखण्याचा आमचा पूर्ण प्रयत्न असेल असे ते पालकांना उद्देशून म्हणाले. मुलांना उद्देशून त्यांनी अशक्य असं काहीच नाही सातत्याने प्रयत्न करत रहा, यश तुमचेच आहे असे ते म्हणाले. शाळा व संस्थेशी यापुढेही संबंध ठेवा, समाजातील गरजूंना मदत करण्याची वृत्ती बाळगा असे म्हणत त्यांनी गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या आयुष्यातील उज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा दिल्या.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा