मुंबई : राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे जोरदार वाहू लागले आहेत. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी राज्यातील २८८ जागांवर निवडणूक लढवली पाहिजे असे विधान करत राजकीय वातावरण रंगविण्यास सुरवात केली आहे. यामुळे महायुतीतील पदाधिकाऱ्यांमध्ये कमालीची चलबिचल सुरू झाली आहे. ठाणे जिल्ह्यातील ५ विधानसभेच्या जागा लढविण्याची तयारी भाजपने सुरू केली असून तशी मागणी केली आहे. यावर शिवसेना शिंदे गटाने असे दावे आम्हालाही करता येतात मात्र हे म्हणजे युतीत मिठाचा खडा टाकण्यासारखे आहे असे म्हणत भाजपला टोला लगावला आहे. तर ठाकरे गटाने माझं ते माझं आणि तुझं ते पण माझं अशी भाजपची नीती आहे असे म्हणत आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीतील पक्षांनी चाचपणी सुरु केली आहे. खासदार नारायण राणे यांनी भाजपने थेट राज्यातील विधानसभेच्या २८८ जागांवर लढलं पाहिजे, असं म्हटलं असून त्यावर शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनी प्रतिक्रिया देताना हे राणे यांचे वैयक्तिक मत आहे, भाजपचे मत नाही. महायुतीमध्ये जर भाजप २८८ जागा लढणार तर महायुती कशाला आहे असे म्हटले आहे.
त्यानंतर कल्याण लोकसभा मतदारसंघात भाजपचे कल्याण जिल्हाध्यक्ष नाना सूर्यवंशी यांनी पत्रकार परिषद घेत कल्याण पूर्व, पश्चिम, डोंबिवली, अंबरनाथ आणि कल्याण ग्रामीण यांसह ५ विधानसभा जागा लढविण्याची तयारी असून त्या जागा मिळाव्या अशी मागणी पक्षातील वरिष्ठांकडे करणार असल्याचे सांगितले.
भाजप पदाधिकाऱ्यांच्या या व्यक्तव्यानंतर शिवसेना शिंदे गट व ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपवर, झोड उठवली आहे. शिवसेना शिंदे गटाचे युवासेनेचे सचिव दीपेश म्हात्रे यांनी सांगितले की, प्रत्येक पक्षाच्या पदाधिकाऱ्याला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. तसेच आमच्याकडच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी लोकसभेतील निकाल बघता त्यांना लोकसभेमध्ये जो लीड मिळाला आहे, तो निर्णय आल्यानंतर आमच्या देखील पक्षातील पदाधिकाऱ्यांच्या मागण्या आहेत की ज्या सीट अनेक वर्ष भाजपा लढत आहे, त्या सेनेला मिळाव्या. आणि भाजपच्या काही सीटवर शिवसेनेने लढावे अशी आमच्याही लोकांची इच्छा आहे. हा सर्व निर्णय आमचे वरिष्ठ पक्षप्रमुख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पक्षाध्यक्ष खासदार डॉ.श्रीकांत शिंदे हे घेतील. परंतु यंदा आम्ही युतीमध्ये लढलो आणि युतीमधील वाटाघाटी मध्ये ज्या जागा ज्या पक्षाला लढायला मिळतील त्यांनी त्या लढवाव्यात. आता या सीटवर आम्हाला लढायचे आहे, त्या सीटवर पण आम्हाला लढायचे आहे, तसा दावा आम्हाला देखील करता येतो. परंतु युतीमध्ये असे दावे प्रतिदावे करणे मला वाटत नाही संयुक्तिक ठरेल असे दीपेश म्हात्रे म्हणाले.
यावर शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपवर टीका केली आहे. ठाकरे गटाचे कल्याण जिल्हाप्रमुख सदानंद थरवळ म्हणाले की, माझं ते माझं आणि तुझं ते पण माझं अशी भाजपची परिस्थिती आहे आणि तशी त्यांची नीती आहे. त्यामुळे मला त्यात काही आश्चर्य वाटत नाही. कारण आत्ताच लोकसभे बरोबर दोन राज्याच्या विधानसभा निवडणुका झाल्या. एक ओरिसा आणि एक आंध्र प्रदेश. ज्या पक्षांनी मागच्या काळात त्यांना संभाळले, त्या दोन्ही पक्षांना या विधानसभेमध्ये संपवून टाकले, भाजपची ही निती आहे. मित्र पक्षाला गरजेपुरतं बरोबर घ्यायचे आणि नंतर त्यांना संपवायचे, असे सांगत भाजपला टोला लगावला आहे. त्यामुळे येत्या काळात या पाचही विधानसभेच्या जागा कोण लढवतं हे aata उत्सुकतेने पहावे लागेल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा