डोंबिवली दि.१७ : संत ज्ञानेश्वरांनी पंढरपूरला पायी वारी करत जाण्याचा पाया रचला तर तो संत तुकाराम महाराजांनी अविरत पणे चालू ठेवला. 'जे एम एफ शिक्षण संस्था' संचलित 'जन गण मन' शाळेमध्ये देखील आषाढी एकादशी साजरी करण्यात आली. सर्व विद्यार्थी वारकरी वेश परिधान करून आले होते, हातात टाळ, मृदुंग, गळ्यात तुळशीची माळ आणि ओठावर पांडुरंगाचे नाव. काहीजण संत बनून आले होते तर सर्वात जास्त आकर्षण ठरले होते ते विठ्ठल रुक्मिणीच्या वेशातले छोटेसे बालविद्यार्थी.
'जे एम एफ' मंडपम मधे पंढरपूरच्या विठ्ठलाच्या मंदिराची प्रतिकृती श्री.पिसाट यांनी बनवली होती. 'जे एम एफ' प्रती पंढरपूर च झालेल्या या वास्तूमध्ये हजारो विद्यार्थी, शिक्षक, पालक यांचा जणू काही संत मेळाच भरला होता. 'जे एम एफ' संस्थेचे संस्थापक माननीय डॉ.राजकुमार कोल्हे आणि सचिव डॉ.प्रेरणा कोल्हे व इतर पदाधिकारी ह्यांनी सर्वप्रथम विठ्ठल रुक्मिणीच्या प्रतिमेचे यथायोग्य पूजन करून दीप प्रज्वलन केले. 'जन गण मन' इंग्लिश सेकंडरी शाळा च्या विद्यार्थ्यानी धरिला पंढरीचा चोर.. हे भजन सादर केले तर जन गण मन विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यानी क्षणभर उघड नयन देवा.. हा अभंग सादर केला. संगीत शिक्षिका सौ. श्रेया कुलकर्णी यांनी संवादिनी वाजवली तर सर्व मुलांनी टाळ वाजवून ठेका धरला. पालकांनी देखील गायन सेवा सादर केली.
नृत्य शिक्षक अभिषेक देसाई यांनी नृत्य दिग्दर्शन करून विद्यामंदिराच्या विद्यार्थ्यांनी विठ्ठलाच्या गाण्यावर पदंन्यास करून विठ्ठलाला आळवणी केली. संस्थापक डॉ.राजकुमार कोल्हे यांनी आजच्या आषाढी एकादशी चे महत्व विद्यार्थ्यांना सांगितले. ज्याप्रमाणे षडरीपूंवर मात करण्यासाठी अहांकरावर आधी मात करावी लागते त्याचप्रमाणे आपल्या शरीरातल्या इंद्रियांना स्वास्थ मिळावे म्हणून हलका फलाहार घेऊन आजच्या दिवशी एकादशी करणे होय असे संस्थापक डॉ.राजकुमार कोल्हे यांनी मुलांना सांगून परमात्मा चा ठाव कुठे आहे हे माहिती नसले तरी आज तुमच्या रूपाने तो परमात्मा, साक्षात पांडुरंग रुक्मिणी आणि संत मंडळीच्या रूपात अवतरले आहेत. भक्त पुंडलिकाने आई वडिलांची सेवा करत असतानाच पांडुरंगाच्या दिशेने वीट भिरकावली व त्या विटेवर उभा राहा असा भक्तिमय आदेश पांडुरंगाला दिला व आजतागायत पांडुरंग त्याच विटेवर कमरेवर हात ठेऊन उभा ठाकला आहे, अशी छानशी गोष्ट संस्थेच्या सचिव डॉ.प्रेरणा कोल्हे यांनी मुलांना सांगून तुम्ही सुद्धा पुंडलिक होऊन आई वडिलांची मनोभावे सेवा करा, तीच सेवा पांडुरंगाला प्रिय आहे, असे सांगितले.
संपूर्ण सोहळ्याचे आकर्षण होते ते म्हणजे शिशूविहार मधील छोट्या मुलांचा 'रिंगण सोहळा'. सर्वच छोट्या मुलांनी "माऊली माऊली" ह्या गाण्यावर दैदिप्यमान असा रिंगण सोहळा केला. संपूर्ण 'जे एम एफ' शाळा रिंगण सोहळ्यात दुमदुमून गेली तर सर्व पालक वर्ग, शिक्षक, विद्यार्थी भान हरपून तल्लीन झाले. तर पालकांना देखील नृत्य करण्याचा मोह अवराला नाही. शिक्षिका दिपाली सोलकर यांनी अतिशय भाव भक्तीने रिंगण सोहळाचे दृश्य मुलांकडून करून घेतले. पांडुरंगाला पंच खाद्याचा नैवेद्य दाखवून डॉ. राजकुमार कोल्हे व डॉ. प्रेरणा कोल्हे यांच्या हस्ते आरती करण्यात आली. त्यानंतर पालखी मधे विठ्ठल रुक्मिणीची प्रतिमा ठेऊन टाळ, मृदंगाच्या गजरात, विठ्ठल नामाच्या घोषात दिंडी काढण्यात आली. सर्व मुलांना प्रसाद देण्यात आला. शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी आजच्या आषाढी एकादशी सोहळ्याचे सुंदर असे आयोजन केले होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा