मुंबई : भारताचे 'मिसाईल मॅन' म्हणून आदराने संभोधले जाणारे माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दूल कलाम हे २७ जुलै २०१५ रोजी आजच्या दिनी आपल्यातून निघून गेले आणि संपूर्ण भारत शोकसागरात बुडाला. राष्ट्रपती भवनात एक सूटकेस घेऊन आलेल्या आणि राष्ट्रपती भवन सोडताना तिच सूटकेस घेऊन थेट आपल्या गावी गेलेल्या या 'अग्निपंखा'वर जगभरातून भावपूर्ण श्रद्धांजलींचा वर्षाव झाला. त्यात एक थेंब गानकोकिळा भारतरत्न लता मंगेशकर यांचाही होता. दिवंगत 'भारतरत्न'ला श्रद्धांजली व्यक्त करताना लतादिदी म्हणाल्या,"दिवंगत राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांच्या कविता माझ्या व्यस्ततेमुळे मी गाऊ शकले नाही याची कायम मला सल राहील".
लतादिदी, आपली व्यस्तता आम्ही समजू शकतो. पण विज्ञानाचे पंख पांघरून अवकाशात आकाश भराऱ्या घेणाऱ्या कलाम साहब यांना भारतवर्ष अंतराळगीत म्हणून गात राहील. साधं राहणीमान आणि उच्चं विचाराचे ते आदर्श उदाहरण होते. भारताच्या या महान व्यक्तिमत्वाला जाहीर सलाम वं मानाचा मुजरा. बारशाचं तेरशाला अन् तेरशाचं बारशाला बोलायचं नसतं. पण जाता जाता मोह आवरत नाही एक आठवण शेअर करण्याची.. कलाम साहेबांच्या औदार्याची !
१७ जुलै १९८० ला सायंकाळी कलाम साहेब आणि तत्कालीन संरक्षणमंत्री समुद्राच्या बिचवर फिरत होते. सॅटेलाईट लाँचिंगची सर्वांच्याच मनात अस्वस्थता होती. कुणीच काही बोलत नव्हतं. अखेर संरक्षण मंत्र्यांनी कोंडी फोडली. ते म्हणाले, कलामजी, बोलिए.. कल जश्न कैसा मनाने का है.. ?
त्यावर कलाम साहेब म्हणाले "अपने सेंटर में १ लाख पौधे लगाकर" !
भारताची अंतराळातील जगाला ओळख करून देणारे असे स्वयंप्रकाशित, स्वयंसिद्ध, आत्मनिर्भर 'अग्निपंख' पुन्हा पुन्हा पृथ्वीतलावर जन्माला येत नसतात. संपूर्ण भारताच्या वतीने 'मिसाईल मॅन' यांना विनम्र अभिवादन आणि आदरांजली !!
जय विज्ञान !
जय संविधान !!
जय भारत !!!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा