पंढरपूर : आषाढी एकादशी निमित्ताने राज्यातून आणि परराज्यांतून लाखो भाविक पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपूरमध्ये जमा झाले होते. हरीनामाच्या जयघोषात दंग झालेले हे वारकरी विठूरायाला आपापल्या परिस्थितीनुरुप काही ना काही पैसे, द्रव्य अर्पण करत असतात. यानिमित्ताने विठ्ठलाच्या दानपेटीत दरवर्षीच कोट्यवधी रुपयांचे दान जमा होते. याची मोजदाज करण्यासाठी मंदीर समितीच्या कर्मचाऱ्यांना कित्येक तास लागतात. यावर्षी पंढरपूरच्या दानपेटीत तब्बल ८ कोटी ३४ लाख रुपये जमा झाले आहेत. देणगी पावत्यांच्या स्वरुपात जवळपास ३ कोटी ८२ लाख रुपये दान करण्यात आले आहे. इतर योजनांमधूनही दान आलं आहे. तर आषाढी वारीच्या काळात तब्बल १० लाख ८८ हजार भाविकांनी विठ्ठलाचे दर्शन घेतले आहे. मंदिर समितीकडून याबाबत नुकतीच माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा २ कोटीचं वाढीव दान आहे. यामध्ये विठ्ठलाच्या चरणावर तब्बल ७७ लाख रुपये दान करण्यात आलं आहे. तर लाडू प्रसाद विक्रीतून ९८ लाखाचं दान आलं आहे. सोनं आणि चांदी यांचे दान जवळपास २ कोटी ५० लाखांच्या घरात आहे.
दरम्यान आषाढी वारीच्या काळात रात्रंदिवस भक्तांना दर्शन देणाऱ्या विठुरायाचा क्षीण घालवण्यासाठी आज प्रक्षाळ पूजा संपन्न झाली. या प्रक्षाळ पूजेनिमित्त देवाला गरम पाण्याने स्नान घालण्यात आले. संपूर्ण मंदिर फुलांच्या आकर्षक सजावटीने सजवण्यात आले होते.
आषाढी यात्रे दरम्यान पंचमीपासून पुढे जवळपास २० दिवस यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांना दर्शन देता यावे यासाठी देवाचा पलंग काढला जातो. ज्यामुळे देव झोपत नाही, अशी भावना आहे. यावेळी देवाचे सर्व नित्योपचार बंद करून केवळ रोजची नित्यपूजा, नैवेद्य, पोशाख आणि संध्याकाळी लिंबूपाणी याचसाठी दर्शन थोड्या वेळेसाठी बंद असते. या २० दिवसात देव झोपत नसल्याने मंदिरही २४ तास उघडे असते. काल रात्री मंदिर समितीच्या वतीने देवाच्या सर्वांगाला तिळाच्या तेलाने चोळून मालिश करण्यात आली. आज दुपारी बारा वाजता देवाच्या पायाला लिंबू आणि साखर चोळून देवाचे अंग मोकळे करण्याची प्रथा पूर्ण केल्यावर देवाला गरम पाण्याने स्नान घालण्यात आले. त्यानंतर विठुरायाला रुद्राभिषेक करण्यात आला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा