डोंबिवली दि.२१: आषाढ पौर्णिमेला महर्षी वेदव्यास यांचा जन्म झाला म्हणून व्यास पौर्णिमा किंवा गुरू पौर्णिमा म्हणून हा दिवस संपूर्ण भारतातून साजरा केला जातो. 'जे एम एफ शिक्षण संस्था' संचलित 'जन गण मन इंग्लिश सेकंडरी शाळा' आणि विद्यामंदिर मधे देखील मोठ्या उत्साहात गुरुपौर्णिमा उत्सव मधुबन वातानुकुलीत दालनामध्ये साजरा करण्यात आला. संस्थेचे संस्थापक डॉ.राजकुमार कोल्हे, सचिव डॉ.सौ प्रेरणा कोल्हे यांचे आगमन झाल्यावर त्यांच्या हस्ते व इतर पदाधिकारी यांनी सरस्वती व व्यास पूजन केले. स्वागत समारंभ झाल्यावर कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. मुख्याध्यापिका श्यामला राव यांनी गुरुपौर्णिमेचे महत्व सांगून छोटीशी गोष्ट देखील विध्यार्थ्यांना सांगितली.
अनेक मुलांनी नृत्य, गायन केले तर काही मुलांनी गुरू शिष्य हा विषय घेऊन गुरू द्रोणाचार्य, शिष्य अर्जुन, एकलव्य, संदिपानी ऋषी, बलराम, श्रीकृष्ण यांच्या गोष्टी सांगून सर्वांची मने जिंकली. तर हिंदी शिक्षिका ममता राय व प्रमोद पगारे यांनी नाटक बसवले व इयत्ता आठवी मधील विध्यार्थ्यांनी गुरू शिष्य संबंधित नाटक सादर केले. गुरू कसा असावा यावर भाष्य करत संस्थापक डॉ.राजकुमार कोल्हे यांनी, गुरू हा 'ज्ञानाचा सागर आणि मायेचा पाझर' असावा असे मुलांना सांगितले. या ज्ञान रुपी सागरातून ज्ञानाचे मोती वेचून घ्या. आपण खूप भाग्यवान आहोत की वेद व्यासांसारखे महर्षी आपले गुरू आहेत. गुरुविण कोण दाखवी वाट.. आपल्या जिभेवर कायम नम्रतेचे शब्द असावेत, कृपया, क्षमा असावी, आभारी असावे. प्रेम ह्या शब्दांनी आपण दुसऱ्याचे मन जिंकू शकतो म्हणून आपल्या व्यवहारामधे गुरुंसारखा नम्रपणा असावा असे डॉ.राजकुमार कोल्हे यांनी सांगितले.
सर्व प्रथम आपले गरू आपले आई-वडील आहेत. आईच्या गर्भात असताना झालेले गर्भसंस्कार आणि बाहेर आल्यावर झालेले सामाजिक संस्कार करणारे आपले आई-वडील म्हणजे आपले पहिले गुरू. ना आदी, ना अंत असलेले वेद व्यास हे तपश्चर्येने महर्षी व्यास झाले, त्यावेळी त्यांच्या मातेने देखील त्यांना हात जोडून महर्षी म्हणून नमस्कार केला. असे व्यसांसारखे तपोबल तुम्हीही प्राप्त करा असे संस्थेच्या सचिव डॉ.प्रेरणा कोल्हे यांनी मुलांना सांगून वेदांबद्दल देखील माहिती दिली.
'जन गण मन' इंग्लिश सेकंडरी स्कूल आणि विद्यामंदिर च्या सकाळ व दुपारच्या सत्रात मोठ्या उत्साहात गुरुपौर्णिमा उत्सव साजरा केला. सहभागी झालेल्या सर्व मुलांना संस्थापक डॉ.राजकुमार कोल्हे आणि सचिव डॉ.प्रेरणा कोल्हे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक देण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सकाळच्या सत्रात संगीत शिक्षिका सौ.श्रेया कुलकर्णी तर दुपारच्या सत्रात सौ.कविता गुप्ता यांनी केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा