डायघर दि.१९ : शिळफाटा येथील श्रीगणेश घोळ मंदिरातील पुजाऱ्यांनी सामुहिक लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली होती. त्यावर आता डायघर पोलीसांनी कडक कारवाई केली आहे. शिळफाटा येथील श्रीगणेश घोळ मंदिरातील पुजाऱ्यांनी सामुहिक लैंगिक अत्याचार करून हत्या केलेल्या या विवाहितेचा मानसिक आणि शारीरिक छळ करणाऱ्या तिच्या पतीला व सासूला गुरुवारी पोलीसांनी अटक केली. न्यायालयाने या दोघा मायलेकाची २० जुलैपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली आहे. या प्रकरणातील आरोपी नणंदेचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे. मनःशांती मिळवण्यासाठी मंदिरात आलेल्या एका तरुणीला मंदिरातील पूजाऱ्यांनी भांग दिली आणि त्यानंतर तिच्यावर अत्याचार केला होता.
बेलापूर येथे राहणाऱ्या अक्षता हीचा तिच्या सासरकडील मंडळींकडून लग्न झाल्यापासून छळ करण्यात येत होता. सुरुवातीला अक्षताला मुलबाळ होत नसल्याच्या कारणावरून सासरकडील मंडळींनी तिचा मानसिक छळ सुरू केला होता. त्यानंतर अक्षताने माहेरुन १० लाख रुपये आणावेत यासाठी तिचा छळ सुरु केला होता. त्यावेळी अक्षताच्या कुटुंबियांनी कर्ज काढुन अक्षताचा पती कुणाल म्हात्रे याला १० लाख रुपये दिले होते. मात्र त्यानंतर देखील त्यांनी अक्षताचा शारीरीक व मानसिक छळ सुरूच ठेवला होता. दरम्यान, पोलीसांनी दोन दिवसापूर्वी अक्षाताचा पती कुणाल म्हात्रे (वय: ३६ वर्षे), सासु मंदा म्हात्रे (वय: ५६ वर्षे) व नणंद दिपमाला सारंग कडु (वय: ४० वर्षे) या तिघांविरोधात छळवणुकीसह अपहाराचा गुन्हा दाखल केला होता. अशातच आता पोलीस देखील या प्रकरणात अधिकची माहिती घेत आहेत.
या घटनेबाबत सविस्तर हकीकत अशी की, घरगुती भांडण झाल्याने एक विवाहित तरुणी डायघर जवळील शीळ फाटा गणेश घोळ या मंदिरात मनः शांतीसाठी आली होती. मंदिराचे मुख्य पुजारी बालक महाराज उत्तर प्रदेश इथं आपल्या गावी गेल्याने काही दिवस गणेश घोळ यांनी मंदिर सांभाळण्यासाठी श्यामसुंदर शर्मा, संतोष कुमार मिश्रा आणि राजकुमार पांडे या तीन पुजाऱ्यांना गावाहून बोलावून घेतलं होतं. पीडित महिला ही बेलापूर इथं राहाणारी आहे. घरात कौटुंबिक वाद सुरु असल्याने ती ६ जुलैला शिळ फाटा रोडवरच्या गणेश घोळ मंदिरात सकाळी १० वाजण्याच्या सुमारास आली. दिवसभर ही महिला त्याच मंदिरात बसल्याने मंदिरातील पुजाऱ्यांनी तिला दुपारचे जेवण दिलं. त्यानंतर संध्याकाळचा चहा देताना या चहा मध्ये भांगेची गोळी मिसळून दिली. चहा प्यायला नंतर महिलेची शुद्ध हरपली. त्यानंतर रात्रभर ही महिला या मंदिरातच होती. रात्रीच्या वेळी मंदिरातील श्याम सुंदर शर्मा, संतोष कुमार मिश्रा आणि राजकुमार पांडे या तीन पुजाऱ्यांनी आळीपाळीने तिच्यावर बलात्कार केला. पहाटे शुद्ध आल्यानंतर ही गोष्ट या महिलेच्या लक्षात आल्यानंतर तिने आरडाओरडा करण्यास सुरुवात केली आणि पोलीसांत धाव घेतली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा