डोंबिवली : "नेहेमेचि येतो मग पावसाळा, कौतुक सृष्टीचे जाण बाळा", पाऊस हा सर्वांचाच आवडता ऋतू, तर पावसाच्या सरी मध्ये भिजणे म्हणजे विलक्षण आनंद. दरवर्षीच हा आनंद लुटण्यासाठी जन गण मन' इंग्लिश सेकंडरी शाळा आणि विद्यामंदिर चे विद्यार्थी सज्ज असतात. पावसात गेलास तर सर्दी खोकला होईल, अशी सक्त ताकीद देणारे पालकांचे पाल्य सदा नाराजच असतात. परंतु 'जे एम एफ' शाळेमध्ये पावसातून चालत जाण्याचा आणि भिजण्याचा आनंद म्हणजेच एक दिवसीय पावसाळी सहल. ह्या पावसाळ्या सहलीचे आयोजन 'जे एम एफ' संस्थेचे संस्थापक डॉ.राजकुमार कोल्हे आणि सचिव डॉ.प्रेरणा कोल्हे यांनी प्रत्येक पावसाळी ऋतू मधे केले आहे, म्हणजेच 'रेन वॉक्'.
दिनांक १९ व २० जुलै रोजी डोंबिवली पश्चिम येथे नवीन झालेल्या माणकोली पुलावर व खाडी परिसर येथे इयत्ता शिशु विहार ते चौथीच्या मुलांना घेऊन जाण्यात आले. पावसात चालत चालत भिजायला मिळणार ह्या कल्पनेनेच मुले आनंदाने भारावून गेली. इतर वेळेला आपली मुले भिजतील ह्या काळजीने मुलांना पावसात न जाऊ देणारे पालक देखील मुलांना पाठवण्यात आनंद घेऊ लागले व मुलांना रेनकोट, छत्री देऊन त्यांचे बालपण पाहू लागले. सर्व शिक्षकांनी देखील काळजीपूर्वक मुलांना रेनकोट घालून, शिस्तबद्ध पद्धतीने रांगेत उभे करून बसमधे बसवले. त्यावेळी मुलांचा आणि पालकांचा चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता.
संस्थेचे संस्थापक डॉ. राजकुमार कोल्हे आणि सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे यांनी मुलांना सदिच्छा देत, सर्व मुले वेगवेगळ्या रंगाचे रेनकोट घातल्यामुळे जणू काही 'जे एम एफ' शाळेमध्ये रंगबिरंगी फुलपाखरेचं अवतरली आहेत असे उद्गार काढून, तुमच्या आनंदामुळे आमचेही मन प्रफुल्लित झाले आहे व पावसाचा मनसोक्त आनंद लुटा असे सांगून मुलांचा आनंद द्विगुणित केला. "गणपती बाप्पा मोरया" चा जयघोष करत बस सुटली आणि मुलांच्या आनंदाचा जल्लोष सुरू झाला. प्रत्येकाच्या मनात, गप्पात एकच आनंद तो म्हणजे पावसात 'रेन वॉक्' करत चालत भिजणे. पावसाची गाणी, नाच करत बसमधून निघालेली स्वारी रेल्वे क्रॉसिंग जवळ येऊन थांबली आणि लांबलचक आगगाडी बघताच पुन्हा मुलांचा जल्लोष सुरू झाला. आगगाडी गेल्यावर थोडे पुढे जाताच माणकोली पुल सुरू झाला, पुलावरून दोन्ही बाजूला दिसणारी खाडी बघुन मुलांचा हर्ष गगनात मावेनासा झाला. अखेरीस बस मधून खाली उतरून पावसाची मजा घेत सर्व बालगोपाल एकमेकांचा हात धरून चालू लागले. रिमझिम पाऊस, मंद वारा, चिमुकल्या डोळ्यात समावणारी पुलाखालील अथांग खाडी. काही मुलांनी हातात घेतलेली छत्री वाऱ्याने हवेत सरकली जायची त्यावेळी पावसाचे पाणी अंगावर पडताना मुलांचा निखळ हासरा दिसणारा चेहरा. अहाहा काय वर्णावे ! ते दृश्य पाहून मन झाले तृप्त. सर्वच मुले आनंदाने नाचू गाऊ लागली. खाडी परिसरात गोल रिंगण करून शिक्षकांनी मुलांसीबत खेळ खेळले. उड्या मारणे, पावसात पाण्यात खाली बसून एकमेकांच्या अंगावर पाणी उडवणे, कागदी नाव करून पाण्यात सोडणे, पावसाच्या सरी हातात घेणे, आकाशाकडे बघत ये रे ये रे पावसा, तुला देतो पैसा.. असे मोठ्याने म्हणत जणू काही पाऊस हा आपल्या गाण्यामुळेच आला आहे असा खरेपणा वाटणे म्हणजेच खरे बालपण. हा बाल आनंद सर्वांनी लुटला. सर्व वर्ग शिक्षिक, कलात्मक शिक्षकांनी मुलांचे फोटो, व्हिडीओ काढून पावसाळी सहलीचा आनंद येथेच्छ लुटला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा