मुंबई : येत्या आठवड्यात येऊ घातलेल्या रक्षाबंधन सणाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने महिला भगिनींना सुखावणाऱ्या लाडकी बहीण योजनेच्या निधी वाटपास सुरुवात केली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे, अशी माहिती भाजपाचे आमदार राणाजगजितसिंह पद्मसिंह पाटील यांनी एक्स खात्यावरून प्रसिद्धी माध्यमांना दिली.
महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंमलात आणली आहे. १ जुलैपासून ही योजना कार्यान्वित झाली असून आतापर्यंक १ कोटी ३५ लाख अर्ज स्वीकारण्यात आले आहेत. तर, रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर १७ ऑगस्ट रोजी हा निधी पात्र महिलांच्या खात्यात जमा होईल, अशी माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली होती. परंतु, त्या आधीच पात्र महिलांच्या खात्यावर पैसे जमा झाल्याची माहिती भाजपाचे आमदार राणाजगजितसिंह पद्मसिंह पाटील यांनी दिली. पैसे जमा झाल्याचा मेसेज आल्याचे काही स्क्रीनशॉटही त्यांनी शेअर केले आहेत.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत १ कोटी ३५ लाख लाभार्थ्यांची यादी तयार झाली आहे. या योजनेच्या लाभार्थ्यांना थेट बँक खात्यात डिबिटीद्वारे लाभ जमा करण्यात येत आहेत. परंतु, पात्र झालेल्या लाभार्थ्यांपैकी सुमारे २७ लाख लाभार्थी महिलांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडले गेलेले नाहीत. या लाभार्थ्यांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडण्याची विशेष मोहिम प्रत्येक जिल्ह्यात राबवण्याचे आदेश आदिती तटकरे यांनी दिले आहेत. तसंच, कोणताही लाभार्थी योजनेपासून वंचित राहणार नाही याची दक्षता प्रशासनाने घ्यावी. त्यासाठी जिल्हास्तरीय बँकर्सची मदत घेण्यात यावी. येत्या १७ ऑगस्टपर्यंत जास्तीत जास्त लाभार्थी महिलांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडून घ्यावेत, अशा सूचना तटकरे यांनी दिल्या आहेत.
दरम्यान, मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी ३१ ऑगस्टपर्यंतची मुदत ही अंतिम नसून अर्जाची प्रक्रिया निरंतर चालणार आहे. ३१ ऑगस्ट़नंतर आलेल्या पात्र लाभार्थ्यानाही या योजनेचा लाभ मिळणार आहे, असंही त्यांनी पुढे स्पष्ट केलं.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा