BREAKING NEWS
latest

पालकांच्या उग्र आंदोलनामुळे रेल्वे सेवा १० तास रोखल्याने बदलापूर प्रकरणी राज्य सरकार कडून 'एसआयटी' चौकशी..

प्रतिनिधी: अवधुत सावंत
  
बदलापूर, दि. २० : बदलापूर पूर्वेतील आदर्श शाळेत दोन चिमुकल्यांवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेच्या विरुद्ध आज संतप्त पालक आणि बदलापुराकरांनी हजारोच्या संख्येने शाळेबाहेर जमत निदर्शने केली. सकाळी साडे सहा वाजल्यापासून पालक आणि नागरिक शाळेबाहेर जमले होते. यावेळी आंदोलकांनी शाळेबाहेर ठिय्या दिला. आरोपी अक्षय शिंदेला कठोर शिक्षा यासह विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या. यानंतर आंदोलकांनी पटरीवर उतरून रेल्वेगाड्या रोखून धरल्या. या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेत राज्य सरकारकडून आता कडक भूमिका घेण्यात आली आहे. बदलापूर येथील दुर्दैवी घटनेची चौकशी करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस महानिरीक्षक दर्जाच्या वरिष्ठ आयपीएस अधिकारी आरती सिंग यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी गठित करण्याचे आदेश दिले आहेत. दोषींवर कठोरातील कठोर कारवाई करण्यासाठी, हा खटला जलदगती न्यायालयात चालविण्यासाठी आजच प्रस्ताव सादर करण्याचे आदेश ठाणे पोलीस आयुक्तांना सुद्धा त्यांनी दिले आहेत व ह्या फास्ट ट्रॅक खटल्यासाठी ज्येष्ठ कायदेतज्ञ ऍड. उज्वल निकम ह्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, बदलापूरमधील नावाजलेल्या शाळेत शिकणाऱ्या दोन मुलींवर अत्याचार झाला. यातील एक चिमुकली चार वर्षांची, तर दुसरी सहा वर्षांची असल्याची माहिती मिळत आहे. शाळेत नुकत्याच सफाई कामगार म्हणून रूजू झालेल्या अक्षय शिंदे नावाच्या २३ वर्षांच्या नराधमाने चिमुकल्यांच्या अजाणतेपणाचा फायदा घेऊन त्यांच्यासोबत पाशवी लैंगिक कृत्य केलं. ही घटना १२ ऑगस्टची आहे. त्या दिवशी सकाळचे वर्ग सुरू असताना घडली. १२ ऑगस्टच्या दिवशी एका मुलीनं शाळेतून घरी परतल्यानंतर तिच्या पालकांकडे तक्रार केली. चिंतेत असलेल्या पालकांनी त्याच वर्गातील दुसऱ्या मुलीच्या पालकांशी संपर्क साधला. नुकतीच त्यांची मुलगीही शाळेत जायला घाबरत असल्याचं त्यांना समजलं. दोन्ही मुलींची अवस्था संशयास्पद वाटल्यानं पालकांनी तात्काळ स्थानिक डॉक्टरांकडे तपासणी करण्याचं ठरवलं. तपासणीनंतर त्या  नराधमानं त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचं उघडकीस आलं. संतप्त पालकांनी घडलेल्या प्रकरणाची सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीनं बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. मात्र, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभदा शितोळे यांनी पॉक्सो प्रकरण असूनही प्रक्रियेला विलंब केल्याचा आरोप आहे. अखेर शुक्रवारी रात्री उशिरा या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. चिमुकल्यांवर अत्याचार करणाऱ्या अक्षय शिंदे या नराधमाला अटक करण्यात आली. त्याला न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी बालकांचे लैंगिक गुन्ह्यांपासून संरक्षण (पोक्सो) कायदा आणि भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणात वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभदा शितोळे यांची तडकाफडकी बदली करण्यात आली, तर शाळेने मुख्याध्यापिकेचे निलंबन करून वर्गशिक्षिका आणि आयाला नोकरीवरून काढून टाकले.

यामुळे झाला नागरीकांचा उद्रेक

बदलापूर पोलीसांनी हा गंभीर गुन्हा नोंदवून घेण्यात अक्षम्य दिरंगाई केली. शहरातील अतिशय नामांकीत असलेल्या संबंधित शाळेनेकडूनही दुर्लक्ष झाल्याची उघडकीस आले. पोलीसांच्या तपासात शाळा व्यवस्थापनाच्या अनेक त्रुटी आढळून आल्या असून निष्काळजीपणाही उघड झाला आहे. मुलींच्या स्वच्छतागृहात महिला कर्मचारी नसण्यासोबतच शाळेतील अनेक सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत नसल्याचंही काही पालकांनी सांगितलं. या घटनेमुळे बदलापूरमधील विद्यार्थी सुरक्षा आणि शाळा व्यवस्थापन पद्धतींबाबत गंभीर चिंता निर्माण झाली आहे. यामुळे बदलापूरच्या नागरिकांमध्ये संतापाची लाट असून आज बदलापूर बंदची हाक देण्यात आली होती. आंदोलक आक्रमक झालं असून आंदोलकांनी रेल्वे स्थानकावर येऊन लोकल अडवली व १० तास रेल्वेची सेवा खोळंबली  याबाबत सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल झाल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. आरोपी अक्षय शिंदे हा बदलापूरच्या आदर्श शाळेत १ ऑगस्ट रोजी कंत्राटी पद्धतीनं कामावर रूजू झाला होता. दरम्यान याच काळात त्याने गैरफायदा घेतला. विशेष म्हणजे शाळेनं मुलींच्या स्वच्छतागृहांच्या साफ सफाईसाठी महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली नसल्याची माहिती समोर आली आहे.

या घटनेच्या निषेधार्थ आरोपींना फशीची शिक्षा व्हावी अशी मागणी करत बदलापूर रेल्वे स्थानकावर ठिय्या आंदोलन केलं होतं. सुमारे सात रेल्वे विभागाला याचा फटका बसला होता. मात्र आंदोलकांनी आपला ठिय्या काही हलवला नाही. पोलीसांसह स्थानिक आमदार आणि मंत्री गिरीश महाजन यांनीही आंदोलन मागे घेण्याचं आवाहन केलं होतं, मात्र आंदोलक मागे हटले नाहीत अखेर पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला. बदलापूरमधील रेल्वे स्थानकामध्ये पटरीवर बसलेल्या आंदोलकांना पांगवण्यासाठी लाठीचार्ज करण्यात केला. आंदोलकांनी पोलीसांवर दगडफेक केली याला पोलीसांनीही दगडफेक करत प्रत्युत्तर दिलं. आता बदलापूर रेल्वे स्थानकावर पोलीसांनी आपला ताबा मिळवला आहे.

शाळा प्रशासनाकडून जाहीर माफी

शाळेत यापुढे सर्वच ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची काळजी घेण्यासाठी यापुढे अनेक उपाययोजना केल्या जाणार असल्याचे शाळेच्या प्रशासनाने म्हटलं आहे. तर या प्रकरणात आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी, यासाठी पालक आणि पोलीसांना सर्वतोपरी सहकार्य आणि कायदेशीर मदत संस्थेच्या वतीने केली जाईल, असंही शाळा प्रशासनाने म्हटलं आहे. शाळा प्रशासनाने घडलेल्या या प्रकाराबाबत सर्व पालकांची जाहीर माफी देखील मागितली आहे.

१० तासांनंतर रेल्वे सेवा हळूहळू पूर्ववत

दरम्यान, आता बदलापूर रेल्वे स्टेशनला पोलीस छावणीचे स्वरूप आलं आहे. सर्वसामान्य नागरिकांनाही आता स्टेशनमध्ये प्रवेश दिला जात नाहीये. आंदोलनामुळे बदलापूर रेल्वे स्थानकात सकाळी १०.१० वाजता रेल्वे वाहतूक थांबवण्यात आली होती. सकाळपासून जवळपास ८ तास आंदोलन सुरू होतं. या काळात बदलापुरवरुन सीएसएमटीकडे तसंच बदलापुरहून कर्जतकडे एकही ट्रेन गेली नव्हती. आता तब्बल १० तासांनी कर्जतवरुन निघालेली पहिली लोकल सीएसटीकडे रवाना झाली आहे. मात्र सध्या सीएसएमटी ते अंबरनाथपर्यंत लोकल सुरू असून अंबरनाथ ते कर्जत दरम्यान रेल्वे वाहतूक ठप्प आहे.

संध्याकाळी गर्दीच्या वेळी कल्याण ते अंबरनाथवरून प्रवाशांसाठी राज्य परिवहन आणि केडीएमसीकडे एकूण १०० बस गाड्यांची मागणी केली आहे. मेल-एक्स्प्रेस सरासरी एक तास उशीराने धावत होत्या.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत