BREAKING NEWS
latest

'फक्त निलंबनाने काय होणार? दुसऱ्या मुलीचा जबाब अद्याप का नोंदवला गेला नाही?’, मुंबई हायकोर्टाने बदलापूर पोलीसांना खडसावले..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

मुंबई : बदलापूरमध्ये एका शाळेत सफाई काम करणाऱ्या कामगाराने दोन चिमुरड्या मुलींचं लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक घटना घडली. चिमुरड्यांवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणाने अख्खा महाराष्ट्र हादरला. या प्रकरणाची दखल आता मुंबई हायकोर्टाकडून घेण्यात आली आहे. याप्रकरणी कोर्टाने सुमोटो याचिका दाखल करून घेतली आहे.

या प्रकरणाची तातडीची सुनावणी सुरु आहे. या सुनावणी दरम्यान मुंबई हायकोर्टाने बदलापूर पोलीसांना झापले आहे. बदलापूर पोलीसांवर या प्रकरणात हलगर्जीपणा केल्याचा आणि दिरंगाई केल्याचा आरोप आहे. फक्त निलंबन करून काय होणार? तसंच या प्रकरणात दुसऱ्या मुलीचा जबाब अद्याप का नोंदवला गेला नाही?, असा सवाल करत हायकोर्टाने बदलापूर पोलीसांना खडसावले आहे. बदलापूरमध्ये दोन चिमुकल्या मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे. त्यानंतर त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी बदलापूरमध्ये जमा झाली होती. आंदोलकांनी संबंधित शाळेत प्रवेश करत तोडफोड केली. त्याचवेळेस काही आंदोलक रेल्वे स्थानकाकडे गेले व त्यांनी रुळांवर ठिय्या मांडला. दरम्यान बदलापूर रेल्वे सेवा ९ ते १० तास संपूर्ण ठप्प झाली होती. राज्यभरात सातत्याने महिलांवर होत असलेल्या अन्याय-अत्याचाराच्या घटनांविरोधात महाविकास आघाडीने आक्रमक पवित्रा घेतला असून येत्या २४ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत