BREAKING NEWS
latest

लाडक्या बहिणींचा धावा करणाऱ्यांनी भानावर येण्यातच सुचले शहाणपण..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

मुंबई: विधानसभा निवडणुका डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. सत्ताधाऱ्यांच्या अशा खेळी 'सुंभ जळाला तरी पिळ कायम' याचं जिवंत आणि ताजं द्योतक होय. लोकसभा निवडणुकीत संविधानाचा जयघोष महाराष्ट्राने मनुवाद्यांना दिलेला दणका अवघा देश जाणतो. त्या पडझडीतून सावरण्यासाठी सत्ताधारी केविलवाणी धडपड करत असून 'लाडकी बहीण' त्याच धडपडीचं एक अपत्य !

ह्या अपत्याचा निवडणुकीत जास्तीत उपयोग करून घेण्यासाठी सरकार रात्रीचा दिवस करत असून विरोधक याला रडीचा डाव संबोधत आहेत. त्यांच्या या आरोपात दम असून त्यातील तथ्यांश न समजण्या इतपत महाराष्ट्रातील जनता वेडी नाही. नवीन विधानसभा २८ नोव्हेंबरपूर्वी अस्तित्वात येणे गरजेचे असल्याने पहिल्यांदा ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात निवडणुका होतील असं सांगितलं गेलं. नंतर बोलले दिवाळीनंतर.. आणि आता चक्क डिसेंबर !
ही चालढकल नेमकी कशासाठी याचं नेमकं उत्तर सरकार देईल असं वाटत नाही. कारण कथनी आणि करणीमध्ये तारतम्य नसलेली त्यांची संस्कृती होय. एकिकडे दिल्लीच्या लाल किल्ल्यावरून 'वन नेशन वन इलेक्शन' च्या वल्गना करायच्या आणि हरियाणा आणि जम्मू काश्मीरसोबत महाराष्ट्राच्या निवडणुका न घेता निवडणुका पुढे ढकलायच्या ! ढकला.. ढकलून ढकलून किती दिवस पुढे ढकलणार ? लाडक्या बहिणींचा धावा करणाऱ्यांना कदाचित अजून समजलं नाही की त्या अत्यंत जागृत असून त्यांना त्यांच्या मताचं मूल्य चांगल्या प्रकारे माहीत आहे. आणि हो...मदत,हक्क आणि उपकार यातील फरक ते लीलया जाणतात आणि कृती विचारपूर्वकच करतात ! दिसेलच ते आता येत्या विधानसभा निवडणूक निकालांमध्ये.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत