नवी दिल्ली : ‘चांद्रयान-३’ मोहिमेअंतर्गत २३ ऑगस्ट २०२३ ला चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चांद्रयान उतरले होते. या ऐतिहासिक घटनेनंतर हा दिवस ‘राष्ट्रीय अंतराळ दिवस’ म्हणून साजरा करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली होती. या पार्श्वभूमीवर उद्या शुक्रवारी २३ ऑगस्ट रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमासाठी काल पत्रकार परिषदेमध्ये भाटवडेकर यांनी चांद्रयान- ४ मोहिमेची माहिती दिली.
'इसरो' अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने ‘चांद्रयान-३’ मोहिमेच्या यशानंतर आता २०२७ मध्ये ‘चांद्रयान- ४ ‘मोहिमेचे नियोजन केले आहे. या मोहिमेला केवळ सरकारची औपचारिक परवानगी बाकी आहे. मात्र त्यासाठीची उलटगणना सुरू असल्याचे ‘इसरो’चे वैज्ञानिक सचिव शंतनू भाटवडेकर यांनी काल दिल्लीत पत्रकारांशी बोलताना सांगितले. यावेळी विज्ञान आणि तंत्रज्ञान खात्याचे मंत्री डॉ. जितेंद्रसिंह हे देखील उपस्थित होते.
शंतनू भाटवडेकर यांनी सांगितले की,”चंद्राच्या पृष्ठभागावर यान उतरवून रोव्हरद्वारे तेथील जमीन, खडकांचे नमुने गोळा करणे आणि हे नमुने पृथ्वीवर आणून त्यांचे विश्लेषण करणे, हे या ‘चांद्रयान-४’ मोहिमेचे उद्दिष्ट आहे. ‘चांद्रयान-५’ चाही आराखडा तयार असून चंद्रावर सूर्यप्रकाश पोहोचू न शकणाऱ्या भागांचे संशोधन या मोहिमेमध्ये केले जाणार आहे. या मोहिमेत यानातून उतरविले जाणारे लॅंडर भारतीय बनावटीचे असेल. त्यामध्ये साधारण ३५० किलोग्रॅम वजनाचे रोव्हर वापरले जाणार आहे. यासाठी जपानमधील जॅक्सा या संस्थेशी बोलणी सुरू आहे.”
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा