मुंबई : मुंबई म्हटलं की सर्वप्रथम विषय निघतो तेथील वाहतूक कोंडीचा. मुंबईचं नाव ऐकताचं आपल्या डोळ्यापुढे वाहनांच्या लांबच-लांब रांगा दिसतात. खरंतर गेल्या काही वर्षांमध्ये राजधानी मुंबईमधील लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून यामुळे शहरात वाहतूक कोंडीची समस्या देखील दिवसेंदिवस जटील बनत चालली आहे. विशेष म्हणजे येत्या काळातही लोकसंख्या वाढतच राहणार आहे. यामुळे ही समस्या आणखी विक्राळ रूप धारण करणार अशी भीती व्यक्त होत आहे. पण ही वाहतूक कोंडी कमी व्हावी यासाठी शासन आणि प्रशासन कटिबद्ध आहे. याचसाठी शासनाच्या माध्यमातून शहरात मेट्रोचे जाळे विकसित केले जात आहे.
मुंबई, पुणे आणि नागपूर मध्ये मेट्रोचे जाळे विकसित होत असून आत्तापर्यंत या तिन्ही शहरांमध्ये काही शेकडो किलोमीटर लांबीचे मेट्रोचे जाळे विकसित झाले आहे. मात्र जर ही वाहतूक कोंडी पूर्णपणे निकाली काढायची असेल तर मेट्रो बरोबरच इतर वाहतूकीच्या पर्यायांचा देखील विचार होणे आवश्यक आहे. याच पार्श्वभूमीवर आता राजधानी मुंबईत एअर टॅक्सी सुरू केली जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार देशाची राष्ट्रीय राजधानी दिल्ली आणि आर्थिक राजधानी मुंबईमध्ये लवकरच एअर टॅक्सी सुरू होणार आहे. यामुळे येथील नागरिकांना वाहतूक कोंडी पासून दिलासा मिळणार आहे. यामुळे नागरिकांच्या इंधनाच्या खर्चात आणि वेळेमध्ये मोठी बचत होणार आहे. ही एअर टॅक्सी प्रदूषण कमी करण्यासही मदत करणार आहे. वायू आणि ध्वनी प्रदूषण कमी करण्यास एअर टॅक्सी प्रकल्प मोठा फायदेशीर ठरणार आहे.
येत्या दोन वर्षात म्हणजेच २०२६ पर्यंत हा एअर टॅक्सीचा प्रकल्प सुरू होईल अशी बातमी मीडिया रिपोर्ट मधून समोर आली आहे. हा प्रकल्प सुरू करण्यासाठी नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने एका समितीची स्थापना केली आहे. एअर टॅक्सीच्या तांत्रिक तपासणीचं काम ‘ऍडव्हान्स्ड एअर मोबिलिटी स्टडी ग्रुप’ ही समिती करणार अशी माहिती यावेळी समोर आली आहे. आम्ही आपणांस सांगू इच्छितो की, एअर टॅक्सीचा प्रकल्प फक्त राजधानी मुंबई आणि राष्ट्रीय राजधानी दिल्लीत सुरू होणार नाही तर देशातील इतरही अन्य महत्वाच्या शहरांमध्ये हा प्रकल्प सुरू होणार आहे.
मुंबईनंतर दिल्ली, बंगळुरु, चेन्नई आणि हैदराबाद मध्येही हा प्रकल्प कार्यान्वित केला जाणार आहे. मेडिकल इमर्जन्सी मध्ये देखील या एअर टॅक्सीचा फायदा होईल अशी आशा आहे. विशेष म्हणजे एअर टॅक्सीची सेवा सुरू झाल्यानंतर ९० मिनिटाचा प्रवास अवघ्या सात मिनिटात पूर्ण होईल असा मोठा दावा देखील संबंधितांच्या माध्यमातून करण्यात आला आहे.
हा शासनाचा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून 'इंटर ग्लोब इंटरप्रायजेस' आणि अमेरिकेतील आर्चर एव्हीएशन या कंपन्या या प्रकल्पासाठी एकत्र आल्या आहेत. यामुळे लवकरच हा प्रकल्प कार्यान्वित होईल असे वाटत आहे. दरम्यान सर्वसामान्यांच्या माध्यमातून हा प्रकल्प लवकरात लवकर सुरू व्हावा आणि नागरिकांना वाहतूक कोंडीतून दिलासा मिळावा अशी आशा यावेळी व्यक्त करण्यात आली आहे. यामुळे आता हा प्रकल्प नेमका कधीपर्यंत सुरू होणार हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा