विशेष प्रतिनिधी
इस्लामपूर, २२ ऑगस्ट २०२४: कोल्हापूर येथे ऑलम्पिक वीर यांच्या मिरवणुकीमध्ये वार्तांकन करण्यास गेलेल्या पत्रकार आणि छायाचित्रकार यांना पोलीस प्रशासनाने धक्काबुक्की केली व त्यांना अयोग्य वागणूक देण्यात आली. या संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करा तसेच बदलापूर येथील वार्तांकन करण्यास गेलेल्या महिला पत्रकाराला अश्लील भाषेत बोलून त्यांचा अपमान करणाऱ्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केंद्रीय पत्रकार संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.
संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संदिप कसालकर यांच्या निर्देशानुसार या संदर्भातील निवेदन इस्लामपूर तालुका वाळवा तहसीलदार सचिन पाटील यांना देण्यात आले. यावेळी राज्य प्रवक्ते चंद्रशेखर क्षीरसागर, सांगली जिल्हा अध्यक्ष रवींद्र लोंढे, ज्येष्ठ पत्रकार दिलीप मोहिते, पत्रकार राजेश कांबळे, जेष्ठ पत्रकार दयानंद माळी व इतर पत्रकार उपस्थित होते.
"पत्रकारांचा अपमान हा लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचा अपमान आहे, हा आम्ही कदापि सहन करणार नाही. संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे आणि अश्लील भाषेत बोलून अपमान करणाऱ्या त्या राजकीय व्यक्तीवर कठोर कारवाई झाली पाहिजे" असे राष्ट्रीय अध्यक्ष संदिप कसालकर यांनी म्हटले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा