BREAKING NEWS
latest

डोंबिवली खंबाळपाडा येथे ऑटो स्टॅन्डवर नंबरात रिक्षा लावण्याच्या किरकोळ वादातून रिक्षाचालकाची हत्या..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली : डोंबिवली पूर्वेकडील खंबाळपाडा परिसरात रिक्षा स्टँडवर नंबर लावण्यावरून दोघा रिक्षाचालकांमध्ये वाद झाला. या  किरकोळ वादातून एका रिक्षाचालकाने दुसऱ्या रिक्षाचालकावर लोखंडी रॉडने हल्ला केला. फटका जिव्हारी बसल्याने रिक्षाचालकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी दिनांक.३ रोजी रात्री आठच्या सुमारास घडली. अविनाश कांबळे असे मृत रिक्षाचालकाचे नाव असून याप्रकरणी सुनील राठोड याच्यावर टिळकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.

टिळकनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खंबाळपाड्याच्या कमानीजवळ रिक्षा स्टँड आहे. या स्टँडवरून ठाकुर्ली, डोंबिवली, कल्याणसह अन्य परिसरात रिक्षा चालतात. त्यामुळे या स्टँडवर प्रवाशांसह रिक्षाचालकांची नेहमीच वर्दळ असते. शुक्रवारी रात्रीच्या सुमारास या स्टँडवर अघटित घटना घडली. रिक्षाचा नंबर लावण्यावरून दोन रिक्षाचालकांमध्ये वाद झाला. सुनील राठोड याने रिक्षात लपवलेला लोखंडी रॉड काढून अविनाश कांबळे याच्यावर हल्ला केला. लोखंडी रॉडच्या साह्याने अविनाशच्या डोक्यात जबरी फटका लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेची माहिती मिळताच टिळकनगर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. त्यानंतर अविनाश कांबळे याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी केडीएमसीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात पाठविण्यात आला. याप्रकरणी टिळकनगर पोलीसांनी गुन्हा नोंदवून हल्लेखोर खुनी सुनील राठोड याला ताब्यात घेतले. या संदर्भात टिळकनगर पोलीस अधिक तपास करत आहेत.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत