डोंबिवली: डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानकाजवळील फडके रस्ता, बाजीप्रभू चौक, इंदिरा चौक भागातील वाहन कोंडी दिवसेंदिवस वाढत असल्याने प्रवासी तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत. ही कोंडी सोडविण्यासाठी पालिका, पोलीस, वाहतूक पोलीस, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी एकत्रितपणे प्रयत्न करायचे आहेत, असे आदेश आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांनी देऊनही ही कोंडी सोडविण्यासाठी प्रयत्न होत नसल्याचे चित्र आहे.
डोंबिवली पूर्व, पश्चिम भागात १६ वर्षाहून अधिक काळ वापरलेल्या भंगार रिक्षा प्रवासी वाहतुकीसाठी सर्वाधिक वापरल्या जातात. हे रिक्षा चालक रिक्षा वाहनतळ सोडून रस्ते, चौक, रेल्वे स्थानकाची प्रवेशव्दारे येथे प्रवासी वाहतुकीसाठी उभे राहतात. आरटीओ अधिकारी डोंबिवली, कल्याणमध्ये फिरत नसल्याने या बेकायदा रिक्षा चालकांची चंगळ असते. त्यामुळे कोंडीत सर्वाधिक भर पडते. डोंबिवली पूर्व भागातील फडके रस्त्यावरून केडीएमटी, एसटीच्या बस, रिक्षा, खासगी मोटारी, कंपन्यांच्या, शाळेच्या बस धावतात. या वाढत्या तुलनेत फडके रस्ता, बाजीप्रभू चौक वाहनांसाठी अपुरे पडत आहेत. बाजीप्रभू चौकात केडीएमटीचा बस थांबा आहे.
पाटकर प्लाझामध्ये पालिकेचे वाहनतळ आहे. हे वाहनतळ सुरू करण्यात राजकीय अडथळे आहेत. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी आरटीओ, वाहतूक पोलिसांना हे वाहनतळ सुरू करण्याच्या सूचना केल्या होत्या. इतर राजकीय मंडळींनी या प्रक्रियेत मुद्दाम अडथळे आणले. बाजीप्रभू चौकातील वर्दळीच्या रस्त्यावर पाच रिक्षा वाहनतळ आहेत. या वाहनतळांवर दोन ते तीन रांगांमध्ये भर रस्त्यात रिक्षा उभ्या केल्या जातात. त्यामुळे कोंडीत आणखी भर पडते.
फडके रस्ता सर्वाधिक वर्दळीचा रस्ता आहे. या रस्त्यावरील हाॅटेल, दुकानांसमोर खरेदीदार आपली वाहने उभी करून निघून जातात. त्यामुळे मोठी वाहने या कोंडीत अडकतात. के. बी. विरा शाळेसमोरील अरूंद गल्लीत पालिकेच्या कचरा वाहू गाड्या, मोटारी दुतर्फा उभ्या असतात. वाहतूक पोलिसांचे टोईंग व्हॅन या भागात फिरत असते. यामधील हवालदाराने दुकानांच्या समोर उभ्या असलेल्या मोटारी, दुचाकी उचलण्यासाठी पुढाकार घेण्याची मागणी नागरिक करत आहेत.
संध्याकाळच्या कंपन्यांच्या, शाळेच्या बस रस्त्यावर आल्या की कोंडीत सर्वाधिक भर पडते. डोंबिवली परिसरातील गृहसंकुलांमधील खासगी बस डोंबिवली पूर्व भागातील विविध रस्त्यांवर उभ्या असतात. या बससाठी रेल्वे स्थानक भागात स्वतंत्र जागा उपलब्ध करून देण्याची मागणी नागरिक करत आहेत. डोंबिवली शहर अलीकडे नियमित वाहन कोंडीत अडकू लागल्याने प्रवासी हैराण आहेत. डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक भागातून मानपाडा रस्ता ते शिळफाटा, पलावा भागात जाणाऱ्या प्रवाशांचे सर्वाधिक हाल होतात. या रस्त्यांवर दररोज कोंडी होते. मानपाडा रस्त्यावरील स्टार काॅलनी छेद रस्ता, सोनारपाडा पोहच रस्ता चौक भागात दररोज कोंडी होते.
डोंबिवलीतील वाहनांची संख्या वाढली आहे. या वाढत्या वाहन संख्येमुळे रस्ते अपुरे पडत आहेत. शहरात कोंडी होणार नाही यादृष्टीने प्रयत्न केले जात आहेत. प्रत्येक चौक, वर्दळीच्या रस्त्यावर वाहतूक पोलीस, वाहतूक सेवक तैनात असतात, असे डोंबिवली वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा