ठाणे : भुयारी गटारात राहून घरफोडी करून त्यानंतर विमानाने गावी पळून जाणाऱ्या ठाण्यातील घरफोडी करणाऱ्या अट्टल गुन्हेगारास अटक करण्यात ठाणे खंडणी विरोधी पथकास यश आले आहे. मुंबईतील सांताक्रूझ भागातील एका भुयारी गटारामध्ये काही दिवस वास्तव्य करायचे. त्यानंतर ठाणे जिल्ह्यातील बंद घराची रेकी करून घरफोडी करायची आणि चोरलेल्या पैशांतून विमानाने पुन्हा त्रिपूरा येथील गावी निघून जायचे अशा कार्यपद्धतीने पोलीसांना जेरीस आणलेल्या एका अट्टल गुन्हेगाराला ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली आहे. राजु मोहम्मद शेख (वय: ४१ वर्षे) असे अटकेत असलेल्या अट्टल घरफोडी करणाऱ्या आरोपीचे नाव असून ठाणे खंडणी विरोधी पथक पोलीसांनी त्याच्याकडून १ लाख १३ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्याला यापूर्वी मुंबई पोलीस आणि गुजरात पोलीसांनी देखील अटक केली होती.
श्रीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील घरफोडीच्या प्रकरणात सहभागी असलेला चोरटा वागळे इस्टेट येथे दागिने विक्रीसाठी येणार असल्याची माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण शाखा युनीट-५ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे, साहाय्यक पोलीस निरीक्षक भुषण शिंदे, उपनिरीक्षक तुषार माने यांच्या पथकाने सापळा रचून घरफोड्या राजु शेख याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता, पोलीसांना त्याच्याकडे १ लाख १३ हजार १०० रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने, रोकड आढळून आली. याप्रकरणी पोलीसांनी त्याला अटक केली आहे.
पोलीसांनी त्याची कसून चौकशी केली असता, त्याने श्रीनगर आणि कापूरबावडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकूण सात घरफोड्या केल्याचे समोर आले. तसेच त्याच्याविरोधात मुंबईतील काही पोलीस ठाण्यात आणि गुजरात राज्यात घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. येथील प्रकरणांमध्ये त्याला अटक देखील झाली होती. शिक्षा भोगून बाहेर पडल्यानंतरही त्याने पुन्हा घरफोड्या केल्या. सांताक्रूझ येथील एका भुयारी गटारामध्ये वास्तव्य करायचे. त्यानंतर काही दिवस घरफोडीसाठी बंद घरांची रेकी करायची. तसेच घरफोडी करून चोरलेला मुद्देमाल विकायचा आणि विमानाने त्रिपूरामधील मूळ गावात निघून जायचे अशी त्याच्या गुन्हेगारीची कार्यपद्धती असल्याचे पोलीसांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा