मुंबई : पूर्ण जुलै महिनाभर राज्यात सर्वदूर प्रचंड प्रमाणात बरसलेल्या पावसामुळे राज्यातील नद्या, धरणे ओसंडून वाहू लागली आहेत. मात्र राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे पूरसदृष्य स्थितीमुळे मोठे नुकसानही झाले आहे. त्यामुळे आता ‘अजून पाऊस नको रे बाबा’ असे म्हणायची वेळ आली आहे. ५ ऑगस्टपासून श्रावणमास सुरु झाला आहे त्यामुळे पाऊस काही प्रमाणात कमी होईल अशी आशा सर्वांनाच वाटत होती. मात्र असे होणार नसून ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन्ही महिन्यांतही जोरदार पाऊस होणार असल्याचे आयएमडी ने जाहीर केलेल्या अंदाजात स्पष्ट झाले आहे. मान्सून हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यात देशात सरासरीपेक्षा अधिक पावसाचे संकेत आहेत. ऑगस्ट ते सप्टेंबर दरम्यान सुमारे १०६ टक्क्यांहून अधिक पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने काल जाहीर केला. हवामान शास्त्र विभागाचे महासंचालक डॉ.मृत्युंजय महापात्रा यांनी मान्सून हंगामाचा दुसऱ्या टप्प्याचा दीर्घकालीन अंदाज जाहीर केला आहे.
१९७१ ते २०२० या कालावधीत देशातील मान्सून पावसाची आकडेवारी पाहता ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात सरासरी ४२२.८ मिलिमीटर पाऊस पडतो. मात्र मान्सूनच्या अखेरच्या टप्प्यातील दोन्ही महिन्यांत देशात १०६ टक्क्यांपेक्षा अधिक पावसाचा अंदाज आहे. पूर्वोत्तर राज्ये, लगतच्या पूर्व भारतातील राज्ये, लडाख, सौराष्ट्र, कच्छ, मध्य आणि दक्षिण द्विपकल्पाचा तुरळक भाग वगळता देशात सर्वदूर सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. ऑगस्टमध्ये मध्य महाराष्ट्र आणि कोकणाचा काही भाग वगळता बहुतांश महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे. उत्तर कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागांत सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता अधिक असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा