BREAKING NEWS
latest

'म्हाडा'ची बनावट वेबसाईट बनवून ग्राहकांची लाखोंची फसवणूक करणाऱ्या दोघांना सायबर सेलने ठोकल्या बेड्या..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

मुंबई:  महाराष्ट्रातील गरीब, अत्यल्प उत्पन्न व मध्यम उत्पन्न असलेल्या नागरिकांसाठी 'म्हाडा' तर्फे सोडत काढून घराचे स्वप्न साकार केले जाते, परंतु काही भामटे म्हाडाची खोटी वेबसाईट बनवून लोकांची फसवणूक व दिशाभूल करीत असल्याचे दिसून येत आहे. मुंबईतील स्वप्नाच्या घरासाठी म्हाडाने २०३० घरांची लॉटरी काढली असून अर्ज भरायला देखील सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे म्हाडाच्या मुंबईतील घरांच्या जाहिरातीनंतर मुंबईकरांचाही मोठा प्रतिसाद म्हाडाला मिळत असून चौकशी संदर्भाने विविध माध्यमातून म्हाडाशी संपर्क साधला जात आहे. त्यातच म्हाडाच्या याच जाहिरातीचा आधार घेऊन म्हाडाच्या घरासाठी अर्ज करण्यास फेक वेबसाईट बनवून नागरिकांची लूट करण्यात येत असल्याच्याही घटना समोर आल्या आहेत. स्वत: म्हाडाने याची दखल घेत पोलीसांत तक्रार दाखल केली होती. म्हाडाच्या घरासाठी डिपॉझिट रक्कम म्हणून भरण्यात येणाऱ्या ५० हजार आणि १ लाख रुपयांच्या रकमेतून मोठा अपहार करण्यात येत असल्याचे उघडकीस आले. त्यानंतर म्हाडाने मुंबई पोलीसांच्या सायबर विभागाकडे तक्रार दाखल केल्यानंतर आता दोन जणांना अटक करण्यात आली आहे.

म्हाडाची बनावट संकेतस्थळ तयार करून नागरिकांची आर्थिक फसवणूक केली जात असल्याची धक्कादायक बाब नुकतीच उघड झाली होती. या प्रकरणाची गंभीर दखल घेत म्हाडाच्या माहिती संचार आणि तंत्रज्ञान विभागाकडून वांद्रे–कुर्ला संकुल येथील सायबर कक्षाकडे तक्रार नोंदवण्यात आली होती. त्यानुसार सायबर पोलिसांनी पुढील कारवाई करत नुकतीच याप्रकरणी दोघांना अटक केली आहे. एकाला नालासोपाऱ्यातून तर दुसऱ्याला माहीम मधून सायबर पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. महत्त्वाचे म्हणजे त्यातील एक म्हाडाचा अधिकारी असल्याचे सांगून लोकांची फसवणूक करत असल्याचे तपासात समोर आले आहे.

बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स सायबर सेल पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री उशिरा नालासोपाऱ्यामधून एकाला तर माहीममधून एकाला अटक करण्यात आली आहे. अमोल पटेल (वय: २९ वर्षे) आणि कल्पेश सेवक (वय: ३५ वर्षे) असे अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणाचा सूत्रधार कल्पेश सेवक असल्याचे तपासात समोर आले आहे. कल्पेश सेवक यानेच बनावट संकेतस्थळ तयार केले होते. तर या बनावट संकेत स्थळावरील पेमेंट लिंकद्वारे पन्नास हजाराची जी रक्कम ऑनलाईन पद्धतीने अदा झाली होती ती कल्पेश सेवक याच्या बँक खात्यामध्ये जमा झाली होती. हाच धागा पकडत पोलीसांनी तपास केला आणि दोन्ही आरोपींना पकडण्यात यश मिळवले. अमोल पटेल हा आपण म्हाडाचा अधिकारी असल्याचे सांगत नागरिकांना घरे दाखवत असे आणि म्हाडाची घरे देण्याच्या नावे त्यांची फसवणूक करत असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत