BREAKING NEWS
latest

मंकीपॉक्स विरोधी लस सीरम इन्स्टिट्यूट बनवणार..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

पुणे, दि.२० : जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) मंकीपॉक्सला जागतिक आरोग्य आणीबाणी म्हणून घोषित केले असताता काल महाराष्ट्र राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने या रोगावर देखरेख आणि व्यवस्थापनासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली. त्यानंतर आज कोरोना लस कोविशील्ड बनवणारी कंपनी सीरम इन्स्टिट्यूटने मंकीपॉक्स (एमपॉक्स) लस तयार करण्याची घोषणा केली आहे. कंपनीचे सीईओ अदर पूनावाला म्हणाले  एमपॉक्स ला जागतिक आरोग्य आणीबाणी घोषित केल्यानंतर, आम्ही लाखो लोकांना मदत करण्यासाठी एक लस विकसित करत आहोत. आशा आहे की आम्ही ती एका वर्षात पूर्ण करू.

एमपॉक्सच्या वाढत्या प्रकरणांमध्ये १९ ऑगस्ट रोजी केंद्र सरकारने देशातील सर्व बंदरे आणि विमानतळांसह पाकिस्तान आणि बांगलादेश सीमेवर अलर्ट जारी केला होता. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने अधिकाऱ्यांना बाहेरून येणाऱ्या प्रवाशांमध्ये मंकीपॉक्सच्या लक्षणांबाबत सतर्क राहण्यास सांगितले आहे. सध्या भारतात मंकीपॉक्सची लागण कोणालाही झालेली नाही. शेवटचे प्रकरण मार्च २०२४ मध्ये उघडकीस आले होते.

आरोग्य सेवा सहसंचालक डॉ. राधाकिशन पवार म्हणाले, एकाच बाधित रुग्णाला मंकीपॉक्सचा प्रादुर्भाव मानला जातो, त्यामुळे प्रत्येक प्रकरणाची रॅपिड रिस्पॉन्स टीमकडून चौकशी करण्यात यावी. संशयित रुग्णांचे प्रयोगशाळेतील नमुने पुणे येथील 'नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी' म्हणजेच एनआयव्ही येथे पाठवावेत. बाधित रुग्णाच्या जवळच्या संपर्कात आलेल्या प्रत्येक व्यक्तीचे वैद्यकीय करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने रविवारी एक बैठक घेतली आणि राज्यांना देखरेख, प्रतिबंध आणि नियंत्रण क्रियाकलापांसाठी निर्देश जारी केले. राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था, महापालिका, नगरपरिषदा, जिल्हा आरोग्य अधिकारी यांना मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत