डोंबिवली : भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता हा स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा सन्मान करणारा आहे. मात्र भाजप परिवाराला सोडून जाणारे सावरकरांचा वारंवार अपमान करणाऱ्यांच्या सोबत जात आहेत. 'राष्ट्र प्रथम, त्यानंतर पक्ष आणि शेवटी स्वतः' ही आमची भूमिका आहे, पण पक्ष सोडून जाणाऱ्या सहकाऱ्यांची भूमिका ही 'स्वतः प्रथम' अशी स्वार्थी भूमिका आहे. त्यामुळे पक्ष सोडून जाणाऱ्यांना त्यांची जागा दाखवा !" असं आवाहन रविंद्र चव्हाण यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना केले.
रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार उदय सामंत यांचा उमेदवारी अर्ज शुक्रवारी दाखल करण्यात आला. त्यापूर्वी रत्नागिरी मतदारसंघातील भाजपच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधताना चव्हाण यांनी हे विधान केलं आहे. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पुण्यात केलेल्या विधानाची देखील आठवण करून दिली. चव्हाण म्हणाले की अमित शाह यांनी पुण्यातील अधिवेशनात म्हटल्याप्रमाणे भाजप हा महायुतीतील मोठा भाऊ आहे. त्यामुळे या निवडणुकीत देखील आपल्याला ही मोठ्या भावाची भूमिका बजावायची आहे. महायुती म्हणून लढत असताना मनात एक आणि पोटात एक असं चालणार नाही. रत्नागिरी मतदारसंघातील महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांमध्ये समन्वय असला पाहिजे. समन्वय असल्यामुळेच लोकसभेला रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात नारायण राणे यांचा दणदणीत विजय झाला. आपल्याला महायुती म्हणून पुन्हा याचीच पुनरावृत्ती करायची आहे. रत्नागिरी जिल्ह्यात एकही जागा भाजपला मिळाली नाही, तरीही भाजपचा कार्यकर्ता महायुती सोबत राहिला हे सांगता आलं पाहिजे. त्यासाठी वीस तारखेपर्यंत रात्रीचा दिवस करा. महायुतीचा प्रत्येक उमेदवार विजयी झाला पाहिजे आणि महायुतीचाच मुख्यमंत्री झाला पाहिजे हे ध्येय डोळ्यांसमोर ठेवून काम करा." असे आवाहन देखील मंत्री रवींद्र चव्हाणांनी रत्नागिरी जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना केले आहे.
रविंद्र चव्हाण यांनी माजी आमदार बाळ माने यांचा खरपूस समाचार घेतला. "संघटनात्मक पातळीवर पक्षाने त्यांना अनेक पदं दिली. सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून काम करताना त्यांना नेहमीच उजवं माप दिलं. आणि तरीही आज स्वार्थासाठी त्यांनी वेगळी भूमिका घेतली आहे. तेव्हा कुठलाही भाजपा कार्यकर्ता त्यांची साथ देणार नाही." असा विश्वास मंत्री रवींद्र चव्हाण यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा