डोंबिवली: कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील २७ गावांची सर्व पक्षीय हक्क संघर्ष समितीचे पूर्वीचे अध्यक्ष गंगाराम शेलार आणि शिवसेना शिंदे गटाचे उपाध्यक्ष गुलाब वझे यांनी संघटनेचे सर्व सदस्यांना विश्वासात न घेता मनमानी पद्धतीने पदाधिकाऱ्यांची नेमणूक केली. त्यामुळे त्याच्यावर इतर सर्व सदस्यांनी नाराजी व्यक्त केली असून खासदार सुरेश उर्फ बाळ्या मामा म्हात्रे यांची नव्याने अध्यक्षपदी निवड केली असल्याचे सरचिटणीस चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. तर २७ गांवातील स्वतंत्र नगरपालिकासह अनेक समस्या सुटव्यात याकरता आपण शासन दरबारी पाठपुरावा करणार असल्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष सुरेश म्हात्रे यांनी सांगितले. बुधवारी दुपारी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते डॉ. वंडार पाटील यांच्या कार्यालयात सर्व पक्ष संघर्ष समितीचे सर्व पदाधिकाऱ्यांनी एकत्रित जमून भिवंडीचे खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांची कल्याण ग्रामीण मधील '२७ गांव सर्व पक्षीय संघर्ष समिती'च्या अध्यक्ष पदी एकमताने निवड केली. त्यामुळे महायुतीला महाविकास आघाडीकडून जोरदार झटका दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. यावेळी वंडार पाटील, सत्यवान म्हात्रे विजय भाने, रामदास काळण, दत्ता वझे, तुळशीराम काळण, वासुदेव संते, वासुदेव गायकर, शरद म्हात्रे, राम पाटील, युवा मोर्चा चे सुमित वझे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
कल्याण ग्रामीणमध्ये २७ गावांची सर्व पक्षीय संघर्ष समिती आहे. ही समिती गेल्या अनेक वर्षापासून कार्यरत आहे. या समितीने गांवे महापालिकेतून वेगळी करण्यासाठी लढा दिला होता. २००२ साली २७ गांवे महापालिकेतून वगळण्यात आली. त्यानंतर पुन्हा ही गांवे २०१५ साली महापालिकेत समाविष्ट केली गेली. सदर गांवे महापालिकेत समाविष्ट करण्यास समितीचा विरोध होता. या गावांची स्वतंत्र नगरपालिका स्थापन करण्याची मागणी जोर लावून होती. २७ पैकी १८ गांवे वगळून त्याची नगरपालिका करण्याचा निर्णय तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने घेतला. हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे. सद्याचे मुख्यमंत्री आणि खासदारांनी ग्रामस्थांच्या समस्या सोडविण्यासाठी काही निर्णय घेतले, ते निर्णय राबविण्याची प्रक्रिया सुरु आहे, मात्र आत्ता सर्व पक्षीय संघर्ष समितीच्या अध्यक्षपदी भिवंडी चे खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांची निवड करण्यात आली. नवे अध्यक्ष हे संघर्ष समितीचे प्रश्न सोडवितील अशी आशा आहे.
मात्र गेल्या महिन्यापासून समितीमध्ये मतभेद असल्याचे चर्चा आहे. समितीचे पदाधिकारी गुलाब वझे आणि काही पदाधिकाऱ्यांची खासदार शिंदे यांच्याशी जवळीक आहे. यातील काही सदस्य अन्य पक्षाचे आहे. त्यामुळे स्थानिक सध्याच्या राजकारणाला कंटाळून हे पाऊल उचलले आहे का अशी चर्चा सर्वत्र रंगली आहे. २७ गांव संघर्ष समितीच्या मार्फत २७ गावांचे रखडलेले विषय आणि सर्व नागरिकांची मागणी आहे की आम्हाला वेगळी नगरपालिका असावी जेणेकरून या गावांचा व्यवस्थित पणे विकास व्हायला हवा. मला असे वाटतं हे लोकशाही राज्य आहे. लोकशाही राज्यामध्ये लोकांच्या मताला खूप महत्त्व असतं आणि जी महानगरपालिका बनते ही लोकांसाठी बनते, स्थानिकांचा विकासासाठी बनते आणि जर स्थानिकांची मागणी असेल तर नक्कीच शासनाने या मागणीचा विचार करायला हवा. आणि ते स्वतंत्र महानगरपालिका किंवा नगर पालिका याची निर्मिती करावी अशी मागणी संघर्ष समितीच्या वतीने आम्ही करत आहोत आणि हा सर्व ग्रामस्थांचा हक्क आहे आणि तो हक्क आपल्याला मागून मिळत नसेल तर त्याच्यासाठी लढा देखील उभारला आहे. या लोकांनी यासाठी अनेक वर्षे लढा दिला आहेत आणि नव्याने जे सरकार येईल या सरकारच्या माध्यमातून लोकशाहीने लोकांना लोकांच्या मताला महत्व दिल जाईल. नवीन महानगरपालिका अस्तित्वात येईल असा विश्वास खासदार सुरेश म्हात्रे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा