BREAKING NEWS
latest

महाविकास आघाडीतील उबाठा गटाचे अधिकृत उमेदवार दीपेश म्हात्रे यांचा जाहीरनामा सादर..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली :  महाविकास आघाडीचे अधिकृत विधानसभा उमेदवार दिपेश म्हात्रे यांनी आज डोंबिवलीच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांचा बहुप्रतिक्षित वचनबद्ध जाहीरनामा सादर केला. महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. 'दिपेश म्हात्रे घेऊन आला ठाकरेंची सेना' या जोशपूर्ण गाण्याचे अनावरण देखील या कार्यक्रमात करण्यात आले. डोंबिवलीतील विकासाच्या प्रत्येक पैलूसाठी तयार करण्यात आलेल्या या जाहीरनाम्याने परिसरातील नागरिकांचे लक्ष वेधले आहे. जाहीरनाम्यातील महत्वाचे मुद्दे खालीलप्रमाणे - 

स्व. रामभाऊ कापसे प्रशासकीय भवन
डोंबिवली पूर्वेतील धोकादायक स्थितीत असलेल्या कल्याण- डोंबिवली महानगरपालिकेच्या इमारतीच्या पुनर्विकासाद्वारे, सर्व प्रशासकीय सेवा एकाच छताखाली आणण्यासाठी हे एकात्मिक प्रशासकीय भवन उभारण्याचा संकल्प आहे. हा प्रकल्प स्व. रामभाऊ कापसे यांच्या नावाने ओळखला जाईल आणि राज्यातील एक आदर्श असा प्रकल्प ठरेल.

१ लाख नव्या रोजगार संधी वंदनीय बाळासाहेब ठाकरे बिझनेस सेंटर
डोंबिवलीतील स्थानिक रोजगाराच्या वाढत्या गरजेचा विचार करुन, बिझनेस सेंटरद्वारे एक लाख नव्या नोकऱ्यांची निर्मिती करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. या केंद्रामध्ये आयटी आणि विविध उद्योगांना संधी उपलब्ध करून देण्यात येईल.

डोंबिवली पश्चिमेतील रेल्वे जागेचा पुनर्विकास
पॉवर हाऊस परिसरातील ३५० एकर रेल्वे जागेचा व्यावसायिक विकास करून आयटी हब, बँकिंग क्षेत्र, आणि मोठ्या व्यवसाय उद्योगांना येथे आणण्याचा संकल्प आहे. यामुळे डोंबिवलीत आर्थिक विकासाच्या नव्या संधी निर्माण होतील.

डोंबिवलीची ठणठणीत आरोग्य व्यवस्था
डोंबिवलीत उत्तम दर्जाची आरोग्यसेवा उपलब्ध होण्यासाठी एक सुसज्ज सरकारी रुग्णालय उभारले जाईल. येथे अतिदक्षता विभाग, विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया, डायलिसिस सेंटर, रक्तपेढी, कर्करोग उपचार केंद्र तसेच आपत्कालीन कार्डिएक ऍम्बुलन्स सेवा उपलब्ध करण्यात येणार आहे.

वाहतूक, रस्ते आणि पार्किंग समस्या
डोंबिवलीत रस्त्यांवरील खड्डे आणि अरुंद रस्त्यांमुळे नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. हे सर्व रस्ते खड्डेमुक्त करून शास्त्रशुद्ध पद्धतीने रुंद करण्यात येणार आहेत, तसेच पार्किंगच्या समस्येवर विशेष वाहनतळ (पार्किंग प्लाझा) उभारण्यात येतील.

पाणीटंचाई दूर करण्यासाठी योजना
रिंग रूट ते दुर्गेवाडी आणि मोठगाव मार्गावर जल शुद्धीकरण केंद्र आणि ८०० मिमी मापाच्या जलवाहिनीद्वारे डोंबिवली पूर्वेतील पाणीटंचाई लवकरात लवकर दूर करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. 

वेद पाठशाळा, वयोवृद्ध देखभाल केंद्र आणि २४७ मदतवाहिनी
 हिंदू संस्कृतीतील वेदांच्या महत्त्वामुळे डोंबिवलीत वेद शाळा सुरु करण्याची योजना आहे. तसेच, वयोवृद्ध नागरिकांसाठी विशेष देखभाल केंद्र आणि २४७ मदतवाहिनी सुरू केली जाईल. 

रेल्वे व्यवस्थापन सुधारणा
डोंबिवली रेल्वे स्थानकाच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यात येईल. ५ नंबर प्लॅटफॉर्मवर शेड, महिलांसाठी शौचालये, विशेष महिला गाड्या, आणि अधिक गाड्या चालवण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील.

कल्याण जिल्हा, डोंबिवली तालुका
ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून कल्याण हा स्वतंत्र जिल्हा करुन त्यात डोंबिवली तालुक्याचा समावेश करणे हा महत्त्वाचा उद्देश आहे. यामुळे प्रशासनाला नागरिकांना वेळेत सेवा देणे सुलभ होईल. या जाहीरनाम्यातील सर्व मुद्यांद्वारे, डोंबिवलीच्या सर्वांगीण विकासासाठी वचनबद्ध असून ठोस योजना तयार केल्याची ग्वाही दिपेश म्हात्रे यांनी दिली. या कार्यक्रमास महाविकास आघाडीचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते, ज्यांनी या विचारांना जोरदार प्रतिसाद दिला.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत