ठाणे : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ करिता शनिवार,दि.२४ नोव्हेंबर २०२४ रोजी मतमोजणी पार पडणार आहे. याकरिता मतमोजणी केंद्रांवर वृत्त संकलन करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार प्रादेशिक व जिल्ह्यातील प्रसारमाध्यम प्रतिनिधींना हिरव्या रंगाचे प्राधिकारपत्र देण्यात आले आहे, अशाच माध्यमांच्या प्रतिनिधींना मतमोजणी कक्षात प्रवेश दिला जाणार आहे.
माध्यम कक्षात माध्यम प्रतिनिधींना संपर्क करण्यासाठी इंटरनेट, संगणक, टिव्हीची व चहापानाची व्यवस्था करण्यात आली आहे. माध्यमांच्या प्रतिनिधींना माध्यम कक्षापर्यंतच आपला मोबाईल वापरता येईल.
मतमोजणी केंद्राच्या दारावरून निवडणूक निर्णय अधिकारी यांनी ठरवून दिलेल्या जागेवरूनच स्टील कॅमेरा किंवा मुव्हीज कॅमरा वापरता येईल. कोणतेही आक्षेपार्ह चित्रण करता येणार नाही. मात्र कोणत्याही परिस्थितीत मतमोजणी कक्षाच्या आतमध्ये मोबाईल घेवून जाण्यास परवानगी असणार नाही. याठिकाणी माध्यम कक्षाच्या नोडल अधिकाऱ्यांसोबत मर्यादित माध्यमांच्या प्रतिनिधींचा गट करुन पाहणी करता येईल. माध्यम कक्षातून फेरीनिहाय माहिती, परवानगी मिळालेले छायाचित्र माध्यम कक्षाच्या नोडल अधिकाऱ्यांच्या माध्यमातून माध्यम प्रतिनिधींच्या व्हॉट्सअप ग्रुपवर प्रसिध्दीसाठी देण्यात येईल, असे जिल्हा निवडणूक विभाग व एकत्रित माध्यम कक्षाने कळविले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा