डोंबिवली : डोंबिवली विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार ना. रविंद्र चव्हाण हे आता चौथ्यांदा या मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवत आहेत. आपण केलेल्या विकासकामांचा लेखाजोखा नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपला कार्य अहवाल पत्रिकेच्या माध्यमातून त्यांनी डोंबिवली रेल्वे स्थानकावर स्वतः नागरिकांमध्ये वाटला आणि विविध विषयांवर त्यांच्याशी संवाद साधला. या प्रसंगी डोंबिवलीच्या स्थानिक नागरिकांनी आणि रेल्वे प्रवाशांनी त्यांच्याकडे लोकल प्रवासासंबंधित काही मागण्या केल्या.
यावेळी रविंद्र चव्हाण यांनी नागरिकांच्या सर्व समस्या जाणून घेतल्या. यामध्ये प्रामुख्याने डोंबिवली रेल्वे स्थानकासह कल्याणवरून १५ डब्यांची गाडी सोडण्याबाबत आणि डोंबिवलीतून लेडीज स्पेशल लोकलसुद्धा सोडण्यात यावी, अशी त्यांची प्रमुख मागणी होती. याबाबत चर्चा केल्यानंतर रवींद्र चव्हाण यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना संपूर्ण माहिती दिली गेली असून लवकरच सकारात्मक बदल घडवून आणू, असे आश्वासन दिले. स्व. रामभाऊ म्हाळगी आणि रामभाऊ कापसे यांचे रेल्वे प्रवाशांसोबत अतूट नाते होते. डोंबिवलीच्या प्रवाशांसोबत नेहमी माझी चर्चा होत असते. त्यांच्या सर्व अपेक्षा आणि मागण्या मी वरिष्ठ पातळीवर पोहोचवणार आहे. या समस्या कशाप्रकारे सुटतील, यावर विशेष लक्ष देऊ असे प्रतिपादन रवींद्र चव्हाण यांनी केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा