डोंबिवली : कल्याण ग्रामीण विधानसभा मतदार संघातील मनसे उमेदवार प्रमोद (राजू) पाटील यांच्यासाठी डोंबिवलीतील पी ऍण्ड टी कॉलोनीत झालेल्या प्रचार सभेत मनसे पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यावर निशाणा साधत मनसे सह सर्वच पक्षातील घाणेरड्या राजकारणावर सडकून टीका केली व घाणेरड्या राजकारणापासून महाराष्ट्राला वाचवणं गरजेचं आहे असे म्हणत कोणत्याही पक्षापेक्षा महाराष्ट महत्वाचा असल्याचं वक्तव्य राज ठाकरे यांनी या प्रचार सभेत केलं.
शिवसेना असू देत, राष्ट्रवादी असू दे, भाजपा असू दे, मनसे असू दे की कोणताही राजकीय पक्ष. या सगळ्यांपेक्षा महाराष्ट्र हा मोठा असून कोणताही पक्ष टिकला, नाही टिकला हे महत्त्वाचं नसून महाराष्ट्र हा टिकला पाहिजे, आताच्या या घाणेरड्या राजकारणापासून महाराष्ट्राला वाचवणं फार गरजेचं आहे, असं सांगत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील राजकीय परिस्थितीवर ताशेरे ओढले. डोंबिवलीच्या पी ऍण्ड टी कॉलनी येथे मनसेचे कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील उमेदवार राजू पाटील यांच्या प्रचारासाठी झालेल्या जाहीर सभेमध्ये ते बोलत होते.
शिवसेना धनुष्यबाण चिन्ह ना उद्धवची प्रॉपर्टी आहे ना एकनाथ शिंदेंची, ती प्रॉपर्टी आहे बाळासाहेबांची असे खडसावत एका मुख्यमंत्र्यांच्या राजकीय कार्यक्रमाच्या स्टेजवर लोकांची करमणूक म्हणून एका भोजपुरी महिलेनं नृत्य केल्याच्या प्रकाराबद्दल राज ठाकरे यांनी संताप व्यक्त केला. ज्या महाराष्ट्राने अटकेपार झेंडे रोवले, ज्या महाराष्ट्राकडे एक सुसंस्कृत महाराष्ट्र म्हणून पाहिलं जायचं त्याच महाराष्ट्रात काही गोष्टी होतात. या गोष्टी तर उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये होत असल्याचं सांगत हीच का लाडकी बहीण योजना ? असा संतप्त सवाल उपस्थित करत एकनाथ शिंदे यांनी या प्रकराकडे वैयक्तिक लक्ष घालण्याची सूचना केली. तसंच आपण आज केवळ आपल्याशी संवाद साधायला आलो असून पुन्हा १५ नोव्हेंबरला याच ठिकाणी येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कल्याण ग्रामीणचे मनसे आमदार आणि उमेदवार राजू पाटील यांनी आपल्या भाषणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या कार्यपद्धतीवर तुफानी हल्ला चढवत त्यांनी या मतदारसंघात उमेदवार दिल्याने त्यांचे प्रथम आभार मानले. तसेच लोकसभा निवडणुकीला आपण केवळ राज ठाकरे यांनी आपल्याला सांगितल्यामुळेच खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना मदत केली असा गौप्यस्फोट सुद्धा केला. यावेळी व्यासपीठावर त्यांचे बंधू रमेश रतन पाटील, मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर, डोंबिवली शहरध्यक्ष राहुल कामत, कल्याण पश्चिमचे उमेदवार उल्हास भोईर, दीपिका पेडणेकर, मनोज घरत, अरुण जांभळे, योगेश पाटील, प्राजक्ता देशपांडे, अतुल जाधव यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं या झालेल्या प्रचारसभेला उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा